शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळवळीची आणि राजकारणाची पार्श्वभूमी असताना आपल्या कर्तृत्वाने शिवसेनेला वेगळी दिशा देण्याचे कार्य उद्धव ठाकरे यांनी केले. राजकारणासोबतच आपले छंद जोपासणारे उद्धव हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व. त्यांच्या कर्तृत्वरुपी आयु्ष्याचा हा ओझरता प्रवास.....
उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असले तरी त्यांना राजकारणात कधीही रस नव्हता. फोटोग्राफी आणि लिखाण यामध्येच ते जास्तवेळ रमत असत. उद्धव यांची काढलेली छायाचित्र अनेक वृत्तपत्रं तसेच मासिकांमध्ये प्रकाशित होत असे. घरी राजकारणाची मोठी परंपरा असली तरी वयाच्या चाळीशी पर्यंत उद्धव यांनी शिवसेनेत फारसे लक्ष घातले नव्हते. त्यांची आवड आणि छंदात ते जास्त वेळ घालवत. मात्र 2002 सालच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांनी खास त्यावेळी निवडणुकीत पक्षाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवली. अनेक शिवसैनिकांनी त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना पक्षीय राजकारणात काम करताना प्रथमच पाहत होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे उद्धव यांच्यातील राजकीय कौशल्य दिसून आले. त्यानंतर ते पक्षाच्या कामात अधिक रस घेऊ लागले. त्याचाच पुढील भाग म्हणून 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष जबाबदारी दिली.
उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद असले तरी पक्षाची धुरा बाळासाहेबांच्याच हाती होती. पुढे वृध्दत्वामुळे बाळासाहेब फारसे सक्रीय नसल्याने उद्धव अधिक सक्रीय झाले. 2013 साली बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा उद्धव यांच्याकडेच आली. राजकारणात उध्दव तुलनेने उशिरा आले असले तरी त्यांनी राजकीय कौशल्ये फार कमी वेळात आत्मसात केली. त्याची प्रचिती 2002 च्या महापालिका निवडणुकीत दिसूनही आली. सुरुवातीला आक्रमक भूमिका असलेल्या शिवसेनेचे पक्षीय संघटन मजबूत करणे, पक्षाचे जाळे विणणे, पक्षाला शिस्त लावणे आदी बाबींवर त्यांनी भर दिला. राज्यातील इतर भागातही पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. 2007 साली त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. तसेच कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत केली होती.
2012 च्या महापालिका निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेने विकासासाठी पुढाकार घेतला. पक्षाची आक्रमक भूमिका थोडीसी बाजूला ठेवत संयत आणि संतुलितपणे पुढे जाण्याचा पायंडा उद्धव यांनी पाडला. 2019 च्या विधनसभा निवडणुकीनंतर राज्याला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून लाभले. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासारखी आक्रमक भूमिका नसली तरी राज्याला शिस्तप्रिय, शांतप्रिय नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्यारुपात मिळाले आहे.
छंदात रमणारे उद्धव
उद्धव ठाकरे हे निसर्गप्रेमी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. फोटोग्राफीमध्ये ते अधिक वेळ रमतात. हेलिकॉप्टरमधून राज्यातील किल्ले आणि निसर्गाचे काढलेले छायाचित्र बरेच लोकप्रिय झाले आहे. त्यांनी काढलेले निवडक छायाचित्र मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये लावली आहे. त्याशिवाय त्यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे दोन कॉफीटेबल पुस्तक प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्रीतील किल्ले, नद्या, मंदिरे, शहरं, निसर्गाचे अप्रतिम छायाचित्रांचे 'महाराष्ट्र देशा' 2010 साली, तर आषाढी वारीचे आळंदी व देहूपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास त्यांनी 'पहावा विठ्ठल' या कॉफीटेबल पुस्तकाच्या रुपाने सर्वांसमोर आणला.
प्राणीप्रेमी उद्धव
प्राण्यांविषयी उद्धव यांना खास प्रेम आणि आपुलकी आहे, याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. फावल्या वेळेत ते दूरचित्रवाणीवर डिस्कव्हरी आणि अॅनिमल प्लॅनेट वाहिन्यांवरील कार्यक्रम आवर्जुन पाहतात. एवढंच नव्हे तर 1995 ते 1999 साली शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना उद्धव यांच्या पुढाकाराने वनरक्षकांना मदत करण्यासाठी एक योजना आखली होती. त्यांतर्गत ते स्वतः विविध जंगलात जाऊन वनरक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जोपासना ट्रस्टची स्थापना करून वनरक्षकांना रेनकोट, टॉर्च आणि गमबूटचे वाटप केले होते.
------
ऋषिराज तायडे, 9404141216