निढळ वासियांच्या निढळाच्या घामाची समृद्धी



           गाव करी ते राव काय करी अशी आपल्याकडे म्हण आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण निढळ या गावात बघायला मिळते. निढळ हे साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील एक छोटेसे गाव. या गावाला भेट देण्याची संधी नुकतीच मिळाली होती. माण-खटाव हा राज्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जात असल्याने निढळ हे गाव सुद्धा तसेच असेल अशी खुळी शंका आमच्या मनात होती. मात्र गावाच्या वेशीवर प्रवेश करताच आमची शंका दूर झाली. गावाच्या तीनही बाजूला असलेल्या डोंगररांगा, त्यावरील केलेले पाणलोट विकासाचे उत्कृष्ठ काम, ओढ्यांवर असणारे साखळी बंधारे, त्यावरून खळाळून वाहणारे पाणी, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे, आदींमुळे गावाची श्रीमंती नजरेत भरत होती.
          
           ग्रामविकासाच्या नानाविध योजना यशस्वीपणे राबवित असलेल्या निढळने प्रगतीची कास धरली आहे. या योजना केवळ राबविल्याच नाही तर त्यामध्ये भरीव काम करत अनेक पुरस्कार पटकावले. निढळच्या विकासाची यशोगाथा सरपंच श्रीरंग निर्मळ, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष दशरथ दळवी यांनी आम्हाला समजून सांगितली. सोबतच आमच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.  
        पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे मुळगाव असलेले निढळ हे खटाव तालुक्यातील ५००० लोकसंख्येचे गाव. दुष्काळग्रस्त भाग असल्याने गावाने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे. चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. गावाला, समाजाला आपले काही देणे लागते, या उदात्त हेतूने त्यांनी ग्रामविकासाची संकल्पना गावकऱ्यांपुढे ठेवली. त्यातून गावकऱ्यांनी ग्रामस्वच्छता, रस्ते, महादेवाचे मंदिर आदी कामे केली. १९९५ साली दळवी साहेबांच्या प्रयत्नातून नाबार्डकडून दीड कोटींचा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम निधी मंजूर झाला. मात्र, लोकसहभागाचा अभाव, पाणलोटाचे महत्व न कळल्याने ही योजना परत गेली. निढळवासियांना त्यांच्या हातून घडलेल्या चुकीचा फटका १९९९-२००० च्या दुष्काळात बसला. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की गावात टँकर्स, चारा छावण्या सुरु कराव्या लागल्या होत्या. या घटनेने मात्र गावकऱ्यांचे डोळे उघडले. झालेली चूक पुन्हा करायची नाही व परत गेलेली योजना परत आणायची असा ठराव २ ऑक्टोबर २००१ रोजी घेतली. २००४ साली पाणलोट विकास कार्यक्रम प्रत्यक्षात सुरु झाला.
            तत्पूर्वी निढळने २००१ पासून ग्रामविकासाची कास नव्याने धरली होती. २००२ साली राज्य शासनाने राबविलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये प्रथम पुरस्कार निढळने पटकावला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमिसंधारण पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील निर्मल ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार निढळला मिळाले.   या पुरस्काराने गावकऱ्यांना लोकसहभागातुन आपण काय करू शकतो हे कळाले. 
           ग्राम विकास समितीचे अध्यक्ष दशरथ दळवी गावाच्या विकासाबाबत बोलताना म्हणाले की २००४ पासून सुरु झालेला एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम सुरुवातीला कराडच्या एका खासगी संस्थेला कंत्राटी पद्धतीने दिल्या गेला. मात्र, कामातील दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे ही योजना स्वतः राबविण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. पहिल्या टप्प्यात १५० हेक्टर क्षेत्रावर काम करण्यात आले. सलग समतल चर (सीसीटी), खोल सलग समतल चर (डीप सीसीटी), सिमेंट बंधारे, दगडी बांध, वृक्षारोपण, आदी कामे करण्यात आली. निढळच्या तीनही दिशेला डोंगर असल्याने त्यावर पडणारे पावसाचे पाणी वेगाने वाहून जात होते. म्हणून डोंगर उतारावर सीसीटी ऐवजी डीप सीसीटी खोदण्यात आले. कारण सीसीटींची खोली कमी असल्याने गाळाने ते लवकर भरतात व आवश्यक तितके जलसंधारण होत नाही. म्हणून ० ते ८ टक्के उताराच्या जमिनीवर १ मी रुंद व १ मी खोल आकाराचे डीप सीसीटी खोदण्यात आले. उतारानुसार खोलीचे प्रमाण कमी-जास्त करण्यात येते. माथा ते पायथा काम करत असताना पावसाचे पडणारे पाणी हे दहा फुटांपेक्षा जास्त वाहू नये, म्हणून उपाययोजना करण्यात येते. त्यामुळे डोंगर उतारावरून वाहत येणारे पाणी चरांमध्ये साठून चांगल्या पद्धतीने जल व मृदा संधारण झाले. शेतातील पाणी शेतातच मुरावे म्हणून शेतीबांध तयार करण्यात आले. तसेच डोंगर उतारावर लावलेली झाडे झपाट्याने वाढली, ओसाड डोंगरं हिरवीगार झाली, असे दशरथ दळवी म्हणाले.
          सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालेल्या पाणलोट विकासाच्या कामामुळे गावकऱ्यांचा हुरूप अधिक वाढला. १५० हेक्टर्स पासून सुरु झालेले काम बघता बघता २००० हेक्टर्स पर्यंत वाढवले गेले. गावातून वाहणाऱ्या ४ ओढ्यांचे खोलीकरण करून त्यावर ५० साखळी बंधारे बांधण्यात आले. त्यातून निढळचा परिसर जलसमृद्ध झाला. विहिरी, बोअर, हातपंप यांना भरपूर पाणी आले. डोंगरउतार, माळरान, रस्ते-ओढे यांच्या दुतर्फा केलेले वृक्षारोपण यामुळे परिसर हिरवागार झाला आहे. निढळने आजपर्यंत केलेले काम हे एवढे प्रचंड आहे की त्यांनी त्यांची आगामी अनेक वर्षाची तहान मिटवली आहे. मात्र गावकऱ्यांची काम करण्याची तहान मात्र अजिबात मिटलेली दिसत नाही. आजही गाव परिसरात ४ जेसीबी मशिन्सच्या साहाय्याने जलसंधारणाचे काम केले जात आहे. डोंगरावरचे पाणी डोंगरावरच थांबावे म्हणून तेथे ठिकठिकाणी छोटे-छोटे जलसाठे तयार केले जात आहे. त्यात पाणी साठून डोंगरउतारावर लावलेल्या झाडांना पाणी पुरवठा होऊन त्याची जोमाने वाढ होत आहे.      
           ज्या पद्धतीने गावात जलसमृद्धी आली, त्यापाठोपाठ आर्थिक समृद्धी सुद्धा येऊ लागली. वर्षातून एकच पीक घेणारा शेतकरी आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे वर्षातून २ ते ३ पिके घेऊ लागला. त्यामुळे गावकऱ्यांच्या खिशात पैसे खेळू लागले. शेतकऱ्यांची पैश्यांची गुंतवणूक व्हावी म्हणून गावात निळकंठेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची २००० साली स्थापना करण्यात आली. जवळपास १००० सभासद संख्या असलेल्या या पतसंस्थेत ५ कोटींच्या वर ठेवी आहेत. नुकतीच पतसंस्थेची दुसरी शाखा नवी मुंबईतील कामोठे येथे सुरु झाली आहे. आगामी काळात पुणे व सातारा येथे शाखा सुरु होत आहे.
 
         गावात ५५ लाख रुपये खर्चातून ग्रामपंचायतीच्या  नूतन इमारतीचे बांधकाम वेगात सुरु आहे. लवकरच ग्रामपंचायतीचे कामकाज नव्या इमारतीतून सुरु होऊन जुन्या इमारतीत महिला बचत भवन सुरु करण्यात येणार आहे. महिला भचत भवनच्या माध्यमातून गावातील महिलांना व बचत गटांना प्रगतीचा मार्ग मिळणार आहे.
          अशाप्रकारे निढळने चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनात व लोकसहभागातून गावाचा विकास साधला.. नियोजनबद्ध पद्धतीने जलसंधारण, मृदसंधारण यासह अन्य क्षेत्रात साधलेली प्रगती राज्यातील इतर गावांसाठी नक्कीच आदर्श आहे. इतर गावांनी सुद्धा निढळ सारखे "निढळाच्या घामाची" समृद्धी आपल्या गावात आणावी व आपल्या गावाला, राज्याला पाणीदार बनविण्यास हातभार लावावा..


-ऋषिराज तायडे,
पुणे.
९४०४१४१२१६
rushirajtayde@gmail.com



शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...