हॅम्लेटच्या मंचावर... तुम्हीसुद्धा !

     नाटककार विल्यम शेक्‍सपियरच्या अजरामर असलेल्या हॅम्लेट नाटकाचे असंख्य चाहते आहेत. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या आणि नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हॅम्लेटची भूमिका करण्याचे स्वप्न असते. जगातील अनेक भाषांसह मराठी रंगभूमीवरील दामू केंकरे यांच्यापासून ते अलिकडे सुमित राघवनने साकारलेल्या हॅम्लेटला रसिकांच्या पसंतीची पावती मिळते. सदासर्वोत्तम असलेला हॅम्लेटला तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून व्हर्च्युअल रिऍलिटी आणि 360 अंशात चित्रित झालेला नवा "हॅम्लेट 360 : थाय फादर्स स्पिरिट"  नुकताच युट्युबवर प्रदर्शित झाला आहे. बदलत्या काळानुसार नाट्यक्षेत्राने नवतंत्रज्ञानाची धरलेली कास नक्कीच स्वागतार्ह आहे. 




           विल्यम शेक्‍सपियर लिखित हॅम्लेट नाटकाचे कथानक आपण अनेकजण जाणतोच. डेन्मार्कचे राजे म्हणजेच हॅम्लेटचे वडिल झोपले असताना त्यांचा भाऊ (हॅम्लेटचे काका) त्यांच्या कानात विष ओतून खून करतो आणि देशाचा राजा होतो. वडिलांच्या मृत्यूने दुःखी झालेला हॅम्लेट आपले महाविद्यालयीन शिक्षण सोडून घरी परततो. तेव्हा त्याला आणखी एक धक्‍का बसतो, तो म्हणजे त्याच्या आईने काकांशी अनैतिकरित्या केलेला विवाह. एकदा हॅम्लेटचा मित्र होरॅशियो त्याला सांगतो, की मृत राजाची आत्मा रात्रीच्या वेळी राजवाड्याच्या परिसरात फिरत आहे. त्याची खात्री करण्यासाठी तो रात्री बाहेर पडतो, तेव्हा वडिलांचा आत्मा हॅम्लेटला सांगतो की माझा खून तुझ्या काकाने केला आहे. तेव्हा हॅम्लेट काकांचा सूड घेण्याची शपथ घेतो. मात्र, बऱ्याच वेळा संधी मिळूनही तो सूड घेऊ शकत नाही. असे प्राथमिक कथानक असलेल्या या नाटकाला आता नवतंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. हॅम्लेट प्रथमच 360 अंशांत चित्रीकरण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर व्हर्च्युअल रिऍलिटीच्या माध्यमातून आपल्याला हॅम्लेटचा भाग होता येणार आहे.



        कॉमनवेल्थ शेक्‍सपियर कंपनी व गुगल यांच्यावतीने तसेच स्टिव्हन मेलर दिग्दर्शित हॅम्लेट नाटक गेल्या शुक्रवारी "डब्ल्यूजीबीएच' या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले. जवळपास 61 मिनिटांचे हे नाटक व्हीआर बॉक्‍स लावून 360 अंश आणि त्रिमितीय स्वरूपात अनुभवताना आपण त्या नाटकाचाच भाग असल्याचा भास होतो. मोठ्या सभागृहावजा रंगमंचावर नाटकाचे चित्रिकरण करण्यात आले असून यासाठी गुगल कंपनीच्या 17 एकत्रित कॅमेऱ्यांचा संच असलेला "यी हॅलो 360' या 360 अंशात चित्रिकरण करु शकणाऱ्या कॅमेराचा वापर करण्यात आला. एका मध्यवर्ती ठिकाणी कॅमेरा बसवून त्याभोवतीचे सर्व दृश्‍य एकाचवेळी चित्रित करण्यात आले. प्रकाशव्यवस्थेचा खुबीने केलेला वापर, जुन्या काळातील फर्निचर्स, विन्टेज मोटारी तसेच शयनकक्षांतील विविध वस्तू नाटकाच्या सौंदर्यात भर घालतात. एका बाथटबमधील पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या हॅम्लेटचे "टू बी ऑर नॉट टू बी' म्हणणे असो किंवा त्याच्या बाजूला शयनकक्षात त्याच्या आईचा सुरु असलेला नट्टापट्टा.. आणि पलिकडच्या बाजूला लेर्टसचा तलवारीसोबत चाललेला सराव असो.. एकाचवेळी आपल्याला हे सर्व बघता येते, अनुभवता येते. हेडफोन्स आणि व्हीआर बॉक्‍स लावून नाटक पाहताना काहीवेळा त्यातील पात्र चक्क आपल्या बाजूलाच असल्याचा भास होता. दरम्यान, त्यातील पात्र सभागृहात फिरताना आपणही तेथे फिरतानाचा अनुभव घेतो. तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या एका आरशात एक प्रतिबिंब दिसते. ते कदाचित आपले वाटत असले तरीही कथानकानुसार ते हॅम्लेटच्या मृत वडिलांची प्रतिमा असते. काही वेळा तर आत्म्याचा आवाज आपल्या पाठीमागून आल्याचाही भास होतो.



        हॅम्लेट नाटकासाठी केलेला या प्रयोग कौतुकास्पद असले तरीही व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये बघताना 61 मिनिटांचे हे नाटक खूपच मोठे वाटते. कारण व्हर्च्युअल रिऍलिटीच्या चित्रफितींचा कालावधी साधारणतः 15 ते 20 मिनिटांचा असतो. त्यामुळे व्हीआर बॉक्‍स लावून तासभराचे नाटक अनुभवणे हे सर्वांना आवडेलच असे नाही. मात्र, दुसरीकडे तीन तासांची ही कलाकृती 61 मिनिटात आटोपणे हे देखील रुचणारे नाही. या नाटकातील काही दृश्‍ये कंटाळवाणी देखील वाटतात. उदाहरणच द्यायचे झाले तर नाटकांत तब्बल 10 मिनिटांचे एक दृश्‍य केवळ दोनच शॉटमध्ये आटोपण्यात आलाय. समीक्षकांनी त्याबाबत टीका केल्यावर नाटकाचे तांत्रिक दिग्दर्शक आणि छायाचित्रकार मॅथ्यू निडरहॉसर म्हणाले की, "व्हीआरमध्ये कोणतीही कलाकृती पाहताना प्रेक्षक त्याच्याशी समरुप झालेला असतो. त्यामुळे कमी वेळात अधिक शॉट्‌समध्ये कथानक पुढे नेणे कठीण असते'. एकंदरीत बघता जागतिक दर्जाची कलाकृती असलेला हॅम्लेट हा नवा प्रयोग युट्युबवर चकटफू प्रदर्शित करुन देखील नाट्यरसिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय.

------
अनुभवा एकदा हॅम्लेट आभासी विश्वात..

https://youtu.be/Jc88G7nkV-Q

ऋषिराज तायडे
rushirajtayde@gmail.com.

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...