साहित्य संमेलन आणि वाद यांचे जणू समीकरणच आहे. साहित्य संमेलनात वाद झाले नाही असे कधी ऐकिवात नाही. नुकत्याचउस्मानाबाद येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही त्याला अपवाद नव्हते. दरवर्षी साहित्य संमेलनात होणाऱ्या वादाकडे सर्वसामान्य साहित्यरसिक कसे बघतो, त्याला साहित्य संमेलनातील घडामोडींबाबत काय वाटले,
संमेनातील ग्रंथप्रदर्शनात फेरफटका मारल्यानंतर कोणकोणत्या पुस्तकांना मागणी होती, याचा घेतलेला हा धांडोळा...
संमेनातील ग्रंथप्रदर्शनात फेरफटका मारल्यानंतर कोणकोणत्या पुस्तकांना मागणी होती, याचा घेतलेला हा धांडोळा...
दरवर्षी आषाढीला पंढरपूरला वारकऱ्यांची मांदियाळी भरते, त्या प्रमाणे दरवर्षी साहित्यिकांची वारी संमेलनाच्या निमित्ताने जमत असतात. नुकतेच उस्मानाबाद येथे 93 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हजारो साहित्यरसिकांचा मेळा जमला होता. इतिहासात प्रथमच उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजकांनीही संमेलन यशस्वी पार पडण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, साहित्य संमेलन आणि वाद होणार नाही, असे काही होऊ शकत नाही. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनही त्याला अपवाद नव्हते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो याची सप्टेंबर महिन्यात संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यापासून यंदाच्या वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला खुद्द दिब्रिटो यांना काही संघटनांकडून धमकीचे पत्र, फोन आले होते. तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारू नका; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी त्यांना देण्यात आली होती. मात्र, फादर यांनी त्याला भीक न घालता संमेलनाध्यक्षपद स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. यथावकाश गेल्या आठवड्यात उस्मानाबादला साहित्य संमेलन पार पडले.
संमेलनाच्या दोन दिवसांपूर्वी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे उस्मानाबादनगरीत आगमन झाले. तत्पूर्वीच काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा निषेधाचे अस्त्र बाहेर काढले होते. "विवेक'सारख्या मासिकांनी तर ऐन संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यात योगदान किती, ते खिस्ती धर्मगुरु असल्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीवर ख्रिस्ती साहित्याचे अतिक्रमण होतेय का, असे सवाल उभे करणारा अंक प्रकाशित केला. ऐन उद्घाटन कार्यक्रमात त्याचे वाटप करण्यात येणार होते; मात्र आयोजकांना त्याची कुणकुण लागताच पोलिसांकरवी संबंधितांची चौकशी करण्यात आली. त्यातून संबंधितांनी संमेलनस्थळी गोंधळ घातला.
साहित्य संमेलनामध्ये अशा क्षुल्लक विषयांवरून गोंधळ का घातला जातो, हा अनेक रसिकांचा सवाल आहे. दरवर्षी संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे, बेळगाव-कारवार मिळून संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या जातात. पोलिस घोषणा देणाऱ्यांना पकडून नेतात. यातून काय साध्य होते? आपल्यासारख्या सर्वसामान्य साहित्यरसिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.. असे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. वर्षांतून एकदा होणारे हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राज्यभरातून रसिक येत असतात. त्यांना येथे येऊन वैचारिक भूक भागवायची असते, मग त्यांना तुम्ही दर्जेदार साहित्य मेजवानी द्यायची सोडून वादाचे प्रसंग अनुभवायला का देता? असाही सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. यंदाच्या साहित्य संमेलनातील एक विषय खूपच मजेशीर होता.. तो म्हणजे "आजचे भरमसाठ कविता लेखन ः बाळसं की सूज'. माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिसंवादात व्यक्त केलेले मुद्दे एकीकडे आणि दुसरीकडे संमेलनस्थळी तीन दिवस अव्याहतपणे सुरु असलेला कविकट्टा. त्याशिवाय निमंत्रितांचा कविकट्टा सुरु होता तो वेगळाच. आजच्या भरमसाठ कविता लेखनाचे प्रतिबिंब या कविकट्ट्यावर सादर झालेल्या कवितांमधून दिसत होते. तीन दिवसांत तब्बल दोन हजारांहून अधित नवोदित कवींनी कविकट्ट्यांवर आपल्या कविता सादर केल्या. त्यातही अनेक कवितांची मांडणी ही यमक जुळवून केल्याचे जाणवत होते. फारच कमी कवितांमध्ये खोली होती, उंची होती. एकापाठोपाठ एक रटाळ कवितांमुळे उपस्थितांमध्ये चुळबुळ वाढत होती. अधिक खोलात चौकशी केल्यावर कळले की, अनेक नवोदित कवी केवळ साहित्य संमेलनाचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हासाठीच कविकट्ट्यांत सहभागी झाले होते.
ग्रंथप्रदर्शन हा साहित्य संमलेनाचा महत्वाचा भाग. ग्रामीण भागात साहित्य संमेलन होत असल्याने पुरेशी साहित्यविक्री होईल की नाही, अशी शंका प्रकाशकांना होती. मात्र, यंदाच्या साहित्य संमेलनाने प्रकाशकांची ही शंका चुकीची ठरवली. गेल्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनापेक्षा उस्मानाबादच्या संमेलनात साहित्यविक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे अनेक प्रकाशकांनी सांगितले. तीन दिवस झालेल्या ग्रंथविक्रीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की पानिपत, ययाती, मृत्युंजय, संभाजी, श्रीमान योगी आदी पुस्तकांना अद्यापही मागणी आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपटामुळे पानिपत पुस्तकाला मागणी वाढल्याचे निदर्शनास आले. हे असे का होते, यावर साहित्यिकांनी, अभ्यासकांनी विचार करायला हवा.
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच साहित्य संमेलन होत असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना सहलीला आणावे, तसे संमेलनस्थळी आणण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही इथे कशासाठी आलात, हे विचारल्यावर पुस्तकांचे प्रदर्शन पाहायला आल्याचे सांगितले. तुम्ही कोणकोणती पुस्तके घेतली, कोणती पुस्तके वाचायला आवडतात, हे विचारल्यावर मात्र ते निरुत्तर झालीत. अनेक शिक्षक केवळ पुस्तके बघा, हात लावू नका, पुस्तके महाग आहेत, असे सांगण्यात धन्यता मानत होते. पुस्तके विकत घेऊन देण्यासाठी कोणताही शिक्षक पुढाकार घेत नसल्याने पुढील पिढीकडे साहित्य संस्कृती किंवा वाचन संस्कृती कशी नेणार याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातला एक कौतुक सोहळा, उत्सव, सण. दरवर्षी मराठी साहित्याचा होणारा हा जागर अधिक विस्तारण्यासाठी आणि येणारे साहित्य संमेलन राजकारणविरहीत आणि वादविरहित होण्यासाठी साहित्य महामंडळ, आयोजक, साहित्यिक आणि साहित्यरसिकांनी एकामेकांच्या सहकार्यांने काम करण्याची गरज अनेक साहित्य रसिक व्यक्त करीत होते. त्यातील एकाचा साधाभोळा सवाल होता - वादेविना जायते साहित्यबोध: असे होऊच शकत नाहीत का?