२० मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण हे नेहमीप्रमाणेच सकाळी जागे झाले. तेव्हा आजच्यासारखे इंटरनेट अथवा मोबाईल नसल्याने वृत्तपत्राच्या माध्यमातूनच बातम्या कळायच्या. त्यामुळे सकाळी गावात आलेल्या वृत्तपत्रातील बातमीने चिलगव्हाण गाव हादरलंच.. बातमी होती गावातीलच साहेबराव करपे पाटील यांनी वर्धाजवळील दत्तपूर आश्रम येथे जाऊन कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केल्याची.. शासनाच्या दरबारी नोंद झालेली ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली... तेव्हापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या मागे सुरू झालेला आत्महत्यांचा ससेमिरा अद्याप थांबता थांबेना...
चिलगव्हाण गावातील साहेबराव करपे पाटील हे प्रतिथयश शेतकरी.. तब्बल १२५ एकर शेती, जवळपास अर्धा एकरभर असलेला भव्य वाडा.. हाताखाली कामाला २०-२५ नोकर-चाकर.. गावाचं १५ वर्षे सरपंचपद सांभाळलं असल्याने पंचक्रोशीत नाव होतं.. पत्नी मालतीसह त्यांना विश्रांती, मंगला व सारिका या तीन मुली व भगवान हा मुलगा होता.. शेतीसह संगीतात आवड असलेले साहेबराव नेहमीच गावातील लहान मुलांना संगीत शिकविण्यास उत्सुक असायचे. स्वतः संगीत विशारद असलेल्या साहेबराव यांनी घडविलेले गावातील अनेकजण आज संगीत शिक्षक म्हणून काम करताय. आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करून त्याचा इतर शेतकऱ्यांना सुध्दा फायदा व्हावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. सव्वाशे एकर शेती म्हटल्यावर खर्च सुध्दा तेवढाच असायचा. एवढी मोठी शेती जरी असली तरी नेहमी भरपूर उत्पन्न होईलच असे काही नाही. तसेच अधून मधून येणारी नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर यातून शेतकऱ्याची मानसिकता खचायला लागते. डोक्यावर बँकेच्या कर्जाच्या वाढत्या डोंगरापेक्षा कर्जाच्या वसुलीसाठी बँकेकडून पाठीमागे लागलेला तगादा साहेबरावांना अधिक त्रासदायक ठरू लागला. त्यातच एम.एस.ई.बी.ने थकीत असलेल्या वीजबिलाची रक्कम न भरल्याने शेतातील कृषी पंपाची व घरची वीज तोडली. घरची वीज तोडल्याने आत्मसन्मान खचलेल्या साहेबराव यांच्या मनावर विपरीत परिणाम केला. नियतीची विचारचक्रे त्यांच्या मनात घिरट्या घालू लागली. त्यातूनच त्यांनी वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी सहकुटुंब ते दत्तपूरला जायला निघाले. सोबत त्यांनी कुणालाही न सांगता कीटकनाशक घेतले. तेव्हा मावशीकडे असलेला भगवान या मुलाला सहलीला जाऊ म्हणून दत्तपूरला घेऊन आले. तेव्हा आपल्या बापाच्या मनात चाललेल्या घालमेलीची व अखेरच्या जीवन प्रवासाची पुसटशीही कल्पना भगवानला नव्हती. एके दिवशी आश्रमात असताना साहेबराव यांनी पत्नी मालतीला भजी करावयास सांगितले. तत्पूर्वी त्यांनी भज्यांच्या पीठात कीटकनाशक मिसळले. सर्वप्रथम आपल्या निरागस लेकरांना ती विषमिश्रित भजी खायला दिली. त्यांचा जीव गेल्यावर पत्नी मालतीला भजी खायला दिली. तिचाही जीव गेल्यावर सर्वांच्या कपाळावर एक एक नाणे सुद्धा ठेवले. स्वतःचे जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवली. चिठ्ठीत त्यांनी आपल्या मनातील वेदनांना वाट मोकळी करून दिली. त्यातील ओळी होत्या, " येऊ दे दया आता गुरु माऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली ".. १९ मार्च रोजी करपे कुटुंबीय काळाच्या पडद्याआड गेलं. एवढेच नव्हे तर आपल्या आत्महत्येची दखल व शेतकऱ्यांच्या वेदना शासनाला कळव्यात व हे प्रकरण दडपू नये म्हणून आश्रमातील त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर त्यांनी 'कुणीही दार उघडू नये, पोलीसांना बोलवा' अशी सूचना लावून ठेवली होती.
राज्यातील पहिलीच सामूहिक आत्महत्या ठरलेल्या ह्या घटनेने चिलगव्हाणसह अवघा महाराष्ट्र हादरला होता. दोन दिवस चिलगव्हाण गावातील चूल पेटली नव्हती. एकाच वेळी एकाच कुटुंबातील सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्याचा कठीण प्रसंग गावकऱ्यांवर आला होता. आज या दुर्दैवी घटनेस ३२ वर्ष पूर्ण होत असताना तसेच आज त्यांच्या वाड्याचा मालक बदललेला असला व त्यांची जमीन शिल्लक नसली तरीही त्यांच्या आठवणीने चिलगव्हाण गाव व शेतकरी वर्ग साहेबराव करपे यांच्या आठवणीने मूकआक्रंदन करत आहे. राज्यातील पहिल्या आत्महत्येच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी अन्नत्याग आंदोलन केलं जातं. राज्यासह विदेशात सुद्धा शेतकरी पुत्रांनी शक्य तेथे अन्नत्याग आंदोलन करून आजवर आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना व सर्व बळीराजाच्या अपार कष्टाला, मेहनतीला अभिवादन केलं जातं.. मात्र गेल्या ३२ वर्षांपासून सुरू झालेला शेतकरी आत्महत्यांचा प्रवास दुर्दैवाने आजही सुरू आहे...
: ऋषिराज तायडे
९४०४१४१२१६
rushirajtayde@gmail.com
महाराष्ट्राचं दुर्दैव आहे,,, आपला शेतकरी जिवानी जातो,,,पण सरकारचे डोळे अजूनही बंद आहे,,
ReplyDelete