क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले




"माये गं माये,

नगं सोडू माझी शाळा,

शिकून शिकून लई मोठं

व्हायचंय मला..!! "

        असा ठाम निश्चय करणारी आजची ग्रामीण भागातील मुलगी  आणि हाच आत्मविश्वास तिच्यात निर्माण करण्यास लावणारी, जिच्या दूरदृष्टीने अवघ्या भारताला स्त्री- शिक्षणाचं महत्व पटवून देणारी, जिच्यामुळे विश्वाच्या पटलावर यशस्वी प्रगल्भ भारताचं नाव कोरणाऱ्या समस्त यशस्वी कर्तृत्ववान व्यक्तींना जन्म देणाऱ्या समस्त मातांना सुसंस्कारित दिशा देणारी, उच्च-निच्चतेचे बंधन झुगारून अवघ्या मानवी समाजाला योग्य दिशा दाखवणारी, तेजाचा वारसा देणारी एकमेव स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले.. 

"नतमस्तक तिच्या चरणी, जिच्यामुळे घडलो आम्ही,

अन घडलं तुम्ही, वारसा हा स्त्री शिक्षणाचा

न मोडेल कोणी न मोडेल कोणी.. !! "

     ३ जानेवारी १८३१ रोजी साताऱ्यातल्या नायगावला लक्ष्मीबाई नेवासे पाटलांच्या घरी जन्म घेणारी ही स्त्री, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंच्या परीस स्पर्शाने तेजोमय राष्ट्र घडविणारी ठरली. सावित्रीबाईंची खरी प्रतिमा म्हणजे पतीच्या क्रांतिकार्यात सहभागी झालेली 'शालीन' स्त्री, ज्योतीबांच्या क्रांतिकार्यात सतत कार्य करणाऱ्या सावित्रीबाईंचे कार्य तितकेच महत्वाचे होते.

    मुलींना शिकविते म्हणून शेणा-मातीच्या गोळ्याचा मार सहन करणे, घराचा पाण्याचा हौद सर्वसामान्यांसाठी खुला करणे, बालहत्या प्रतिबंधक गृहातील विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन वात्सल्यपूर्ण संगोपन करणे, असे क्रांतिकारी कार्य या देवतेने केले. तसेच विवाहानंतर स्वतः साक्षर होऊन विपरीत परिस्थितीत शिक्षिका बनणे, मुख्याध्यापिकेचे काम विना वेतन आनंदाने करणे, दुष्काळात व्हिक्टोरिया आश्रमातील भुकेल्या एक हजार मुलांची भूक भागविणे, ज्योतीबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळणे, प्लेगच्या साथीत मृत्यूला कवटाळावे लागते हे माहिती असून सुद्धा मानवतेच्या कार्यात अखंड वाहून घेणे असे डोळे दिपविणारे सावित्रीबाईंचे कार्य समाजापुढे आदर्श ठेवून आहे.

        चूल आणि मूल एवढाच सीमित संसार करण्यापेक्षा अवघ्या समाजाचा संसार त्यांनी आनंदाने व उत्साहाने पार पडला. एकाची माता होऊन जगण्यापेक्षा त्या जगत् माता बनल्या. कठीण असे समाजकार्य करता करता त्यांच्यातील कवयित्री उभारून येत होती. सावित्रीबाईंचा १८५४ साली प्रकाशित झालेला 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह हा अप्रतिमच..  १८९२ साली 'बावनकशी रत्नाकर' हे त्यांचे दीर्घकाव्य प्रकशित झाले. तसेच 'पितरपुराण' नावाचा काव्यसंग्रह त्यांनी रचल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. त्यांची काव्यरचना समाज प्रबोधनपर तर आहेच तसेच त्यांनी विविध विषयांवर सुद्धा काव्य लिहिले आहे. उदाहरणार्थ निसर्गविषयक, सामाजिक, प्रार्थना, आत्मपर, बोधप्रत, इतिहास, स्फुटलेखन अशा अनेक विषयांच्या अनुषंगाने त्यांचे काव्य बहरत गेले.

"ताराबाई माझी मर्दानी

भासे चंडिका रणांगणी,

रणदेवा ती श्रध्दास्थानी

नमन माझिये तिचिया चरणी."

       तसेच कवीचे भावविश्व चेतविणारा चाफा सावित्रीबाईने खालील शब्दात सुरेख चितारला आहे.

"पिवळा चाफा,

रंग हळदीचा

फुलाला आहे...

नाव तयाचे

सुवर्ण चंपक

सृष्टी दागिना

मानस पटतो....!!"

      स्त्रियांच्या बाबतीत असणारा सावित्रीबाईंचा दुरदृष्टीकोन आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरला आहे. संपूर्ण जगाला स्त्री शिक्षणाचे महत्व पटले आहे. आज आदर्श राष्ट्र घडविण्यास स्त्रियांचा त्यांच्या कार्यक्षेत्रातील वाटा नेत्रदीपक आणि ठसठशीत दिसणारा आहे. भविष्याला ओटीत फुलविणाऱ्या अन स्त्रीशिक्षणाचा ठसा उमटविणाऱ्या सावित्रीबाईंची क्रांतीज्योत प्रखरतेने तेजोमय झाली आहे. आज अवघ्या विश्वाला भारतीय स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने  कवेत घेतले आहे. आकाशापासून तर पाताळापर्यंत सर्वच क्षेत्रांत असंख्य स्त्रिया आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे.

   १९ व्या शतकात सावित्रीबाईंनी पाहिलेले स्त्रीजगताचे स्वप्न आज खऱ्याखुऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. म्हणून आज सावित्रीबाई फुले यांना म्हणावेसे वाटते की, "सावित्रीबाई, आज भारतीय स्त्रियांचे सर्व क्षेत्रातील नेत्रदीपक यश पाहण्यासाठी व त्यांचा कौतुक सोहळा साजरा करण्यासाठी आज तुम्ही हव्या होतात..  आज त्यांच्या कार्यकर्तृत्वाला त्रिवार अभिवादन..!!!

              

No comments:

Post a Comment

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...