श्री संताजी जगनाडे महाराज

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेल्या परंपरेला अनेक संतांनी पुढे नेले. समाजाच्या प्रबोधनासाठी जगदगुरु तुकाराम महाराज यांनी चालवलेल्या कार्यात मोलाचा वाटा उचलला तो, संताजी जगनाडे महाराज यांनी. संताजी महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा पुन्हा आपल्यापर्यंत पोचल्या. तुकाराम महाराज आणि संताजी महाराज यांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. संताजी महाराजांचे तुकोबारायांच्या विचारांशी असलेलं तादात्म्य हे कमालीचे एकरूप आहे.

संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ६ डिसेंबर १६२६ रोजी चाकण जवळील सदुंबरे येथे झाला. लहानपणापासून संताजींना अध्यात्म आणि देवदर्शनाची आवड होती. संताजी महाराजांचे आजोबा भिवाशेठ जगनाडे यांचा तेलाचा घाणा होता. तेलाचा हा व्यवसाय त्यांचा मुलगा विठोबाशेठ यांच्याकडे आला. विठोबाशेठ यांचं लग्न सुदुंबरे येथील काळे परिवारातील मथुबाईंसोबत झालं. काही ठिकाणी त्यांच्या नावाचा मथाबाई असाही उल्लेख येतो. विठोबा आणि मथाबाईंच्या पोटी संताजी महाराजांचा जन्म झाला. संताजींना अक्षरओळख, गणित असं बऱ्यापैकी शिक्षण मिळालं. संताजी अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांची निरीक्षणं अत्यंत सूक्ष्म असायची. वयाच्या दहाव्या वर्षी वडलोपार्जित तेलाच्या व्यवसायात संताजींचा प्रवेश झाला. अकराव्या वर्षी संताजींच्या विवाहासाठी स्थळ सांगून आलं. त्याकाळात लग्न बालवयातच व्हायची. खेड येथील कहाणे परिवारातील यमुनाबाईंसोबत त्यांचं लग्न झालं. पुढे चालून त्यांना बाळोजी व भागू ही मुलं झालीत. 

संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात. गावातील या मंदिरात आई पूजा करायची आणि देवाला नैवेद्य अर्पण करायची. चक्रेश्वराच्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ झालेला मनुष्य त्यांना दिसला. संताजींनी नैवेद्याचं ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. मात्र नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजींनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी महाराज म्हणाले मी, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहानपणीच त्यांना माणसातील ईश्वर दिसला. 

   संताजी महाराजांचे आणि तुकोबांच देहू जवळच होते.  जगद्गुरू तुकोबारायांच्या कार्याची मोठी व्याप्ती होती. प्रत्यक्ष भेटून किंवा ऐकून तरी सर्वांना तुकाराम महाराज माहीत होतेच. त्यातूनच १९४० मध्ये संताजी आणि तुकोबांची भेट झाली. तुकोबांंच्या कार्याचा प्रभाव संताजींवर झाला. तुकोबा सादर करत असलेले अभंग संताजी लिहून काढत. काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की ते तुकोबांचे लेखनिक होते. मात्र, याबाबत एकमत नाही. तुकोबांना संताजी गुरुस्थानी मानत.तुकोबांसोबत ते अभंग लिहू लागले. 

संताजी महाराज आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत. संत तुकाराम महाराजांनी अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितलं. त्यामुळे वैदिक कर्मकांड करणाऱ्यांचा विरोध व छळ त्यांना भोगावा लागला. संताजी महाराज हे त्यांच्या पक्षातले, म्हणून हा दाह त्यांच्याही वाट्याला आलाच. पण संताजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या लेखनाचं व प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. अभंगांसह त्यांनी ‘शंकर दीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचं लावण्य’ आणि ‘तेल सिंधू’ या ग्रंथांचं लेखन केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. त्यांची काव्यप्रतिभा विलक्षणच होती. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपकं, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगांतून झळकतं. त्यांच्या सहजलेखनात किती मोठ्ठं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, हे पुढील अभंगांवरून लक्षात येईल- 

मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही। आपुल्या कृपेने होईल सर्वथाही।। १ ।। 
होईल मज आणि माझिया कुळांशी। पांडुरंग मुळाशी सर्व आहे।। २।। 
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे। आपुले ते मन सुधारले।। ३ ।। 

आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा। नंदी जोडियला मन पवनाचा।।१।। 
भक्ति हो भावाची लाट टाकियली। शांती शिळा ठेवीली विवेकावरी।।२।। 
सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस। प्रपंच जोखड खांदी घेतीयले।।३।। 
फेरे फिरो दिले जन्मवरी। तेल काढियले चैतन्य ते।।४।। 
संतु म्हणे मी हे तेल काढियले। म्हणुनी नांव दिल संतु तेली।।५।। 


मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी म्हणजेच ३ जानेवारी १६८८ ला संताजी महाराजांनी देह ठेवला. तुकोबांची संतपरंपरा पुढे चालवण्याबरोबर समाजाच्या उद्धारासाठी केलेला अट्टाहास ही संताजी महाराजांची ओळख. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं. यात त्यांचा कार्यकाळ १६२४ ते १६८८ असा सांगितला आहे. शासकीय मतानुसार संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन ठरतात. काही मतप्रवाहानुसार त्यांचा कार्यकाळ १६५० ते १६०८ असाही सांगितला जातो.  त्यांच्या प्रेमाची, विश्वासाची, श्रद्धेची आणि आपुलकीची. एका ज्ञानसाधकाच्या, प्रबोधनकाराच्या, तत्त्ववेत्त्याच्या ऐहिक आयुष्याला जरी मर्यादा असली तरी, त्यांच कार्य अमर्याद, असीम, अभंग आणि अखंडच असतं. वारकरीधर्मातील संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 

No comments:

Post a Comment

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...