इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा नवा अध्याय - "ब्लॅकमिरर : बॅंडरस्नॅच"

   अनेक दमदार कथानक असलेल्या वेबसिरीजमुळे प्रदर्शित करून नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉन प्राईमने डिजिटल क्षेत्रात दबदबा निर्माण केला. कथानक, विषय मांडण्याचे स्वातंत्र्यामुळे डिजिटल माध्यम इतर माध्यमांपेक्षा अधिक प्रगल्भ होत आहे. त्यातच नेटफ्लिक्‍सने गेल्या शुक्रवारी (ता.28 डिसेंबर) बहुप्रतिक्षीत "ब्लॅक मिरर ः बॅंडरस्नॅच' ही वेबसीरीज प्रदर्शित केली. 2011 साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक मिरर या साय-फाय मालिकेचा पाचवा भाग नुकताच प्रदर्शित झाला. बॅंडरस्नॅच या पाचव्या भागात नेटफिलक्‍सने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत, प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी दिली आहे. पूर्वीच्या व्हिडीओ गेम्समध्ये आपल्याला पर्याय देता येत असे, त्याचप्रकारे इंटरॅक्‍टीव्ह स्टोरीटेलिंगचा वापर या मालिकेत केला आहे. म्हणजेच कथानकानुसार आपल्यामसमोर आलेल्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडल्यावर त्यानुसार कथानक पुढे जाते. इंटरॅक्‍टिव्ह स्वरूपात सादर झालेल्या हा प्रयोग या क्षेत्रात कदाचित प्रथमच झाला आहे. ब्लॅकमिररच्या भागात बॅंडरस्नॅच या "तुमच्या आवडीचे कथानक तुम्हीच निवडा' प्रकाराच्या पुस्तकावर आधारित या भागातील नायक स्टिफन बटलर हा संगणक अभियंता त्याचप्रकारचा व्हिडीओगेम बनवतो. त्याचीच कथा यामध्ये दाखवली आहे.

नेमकं तंत्रज्ञान काय आहे? ः 

        प्रेक्षकांनी निवडलेल्या पर्यायानुसार कथानकाचा कालावधी हा 40 मिनिटांवरून दोन तासांहून अधिक वेळेपर्यंत वाढू शकतो. बॅंडरस्नॅच या भागाचे निर्मात्यांनी विविध प्रकारचे पाच शेवट तयार केले आहे. त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून कितीतरी पर्याय तयार केले जाऊ शकतात. एखाद्या प्रेक्षकाने निवडलेल्या पर्यायानुसार त्याचे कथानक पुढे जाते. इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंग स्वरूपात कथानक सादर करण्यासाठी नेटफ्लिक्‍सने नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरले आहे, हे अद्यापही त्यांनी जाहीर केले नाही. मात्र, पर्याय प्रेक्षकांसाठी पर्याय देणे आणि प्रेक्षकांनी ते पर्याय निवडणे, आणि त्यानुसार कथानक पुढे नेणे यासाठी अल्गोरिदम आणि फ्लोचार्टचा वापर केला आहे. त्या काही तंत्रविषयक संकेतस्थळांवर दिलेल्या माहितीनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परम्युटेशन-कॉम्बिनेशन थेअरीचा वापर यामध्ये केला आहे. 

इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा इतिहास ः
      ब्लॅक मिरर ः बॅंडरस्नॅच ही पहिलीच इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंग वेबसिरीज असली तरीही हा प्रकार काही नवा नाही. इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगला अनेक वर्षांचा इतिहास आहे. पाश्‍चात्य देशात खुल्या रंगमंचावर किंवा मैदानात सादर होणाऱ्या कलाविष्कारावेळी सादरीकरणा दरम्यान प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादानुसार सादरीकरणात बदल केले जात होते. त्याचप्रमाणे 1960 च्या दशकात आलेल्या "दि ऍडव्हेन्चर ऑफ यु ऑन शुगरकेन आयलॅंड' या पुस्तकाच्या मालिकेत देखील इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंग पद्धतीचा वापर केला गेला. त्यातील कथानकानुसार दोन पर्यायांची निवड दोन वेगवेगळ्या परिच्छेदातून निवडता येते. अमुक एका पर्यायासाठी - "परिच्छेद अ' आणि तमुक एका पर्यायासाठी - "परिच्छेद ब' दिला जातो. 1967 साली प्रदर्शित झालेल्या "किनॉटॉमॅट' या चित्रपटात देखील इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा प्रकार हाताळला गेला. एका 127 आसनी चित्रपटगृहातील प्रत्येक आसनाला दोन बटन दिले होते. कोणतेही एक बटन दाबून चित्रपटातील कथानकानुसार प्रेक्षकांना दोन पर्यायांपैकी एकाची निवड करता येते. 90च्या दशकातील व्हिडीओ गेमिंगमध्ये इंटरॅक्‍टिव्ह प्रकार खूप लोकप्रिय होता, हे आपण सगळेच जाणतोच.


      भविष्यात गेझ डिटेक्‍शन, गेस्चर कंट्रोल, व्हॉईस कंट्रोल, व्हर्च्युअल रिऍलिटी या तंत्राचा वापर करून इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा प्रकार अधिक प्रगल्भ होईल. म्हणजेच प्रेक्षकांना कथानकात त्याच्या आवडीनुसार अधिक निवडस्वातंत्र्य मिळण्याची शक्‍यता आहे. सद्या दिले जाणाऱ्या दोन पर्यायांऐवजी अनेक पर्याय उपलब्ध होतील. त्याचप्रकारे सद्या केवळ वेबसिरीज पुरता मर्यादित असलेला हा प्रकार पुढे चालून दुरदर्शनवर रोज येणाऱ्या मालिकेमध्ये आला, तर आश्‍चर्य वाटायला नको. या नवतंत्रज्ञानामुळे या माध्यमात पुढे आणखी वेगवेगळे हाताळले जातील. नेटफ्लिक्‍सने केलेला हा प्रयोग म्हणजे डिजिटल माध्यमात आपले स्थान अधिक घट्ट करण्याचा देखील डाव असल्याचे बोलले जाते.

------
ऋषिराज तायडे,
rushirajtayde@gmail.com

No comments:

Post a Comment

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...