जागतिक अर्थव्यवस्थेतील महिलाराज


      भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी काल (८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे हाती घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच जागतिक बॅंक आणि आर्थिक सहकार्य आणि विकास परिषदेसारख्या महत्त्वाच्या संस्थांची आर्थिक धुरा महिलांच्या हातात आहे. जागतिक बॅंकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी पिनेलोपी गोल्डबर्ग, तर आर्थिक सहकार्य आणि विकास परिषदेच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लॉरेन्स बुन आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे. सद्याच्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगाचे आर्थिक नेतृत्व महिलांच्या खांद्यावर देत खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा गौरव केला आहे.

1. गीता गोपीनाथ 


       आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिना लगार्ड यांनी आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून गीता गोपीनाथ यांची नियुक्ती केली. मॉरिस ओब्स्टफिल्ड हे ३१ ऑक्टोबरला निवृत्त झाल्यानंतर या पदावर गोपीनाथ यांची नियुक्ती झाली. या पदावर निवड होणाऱ्या गोपीनाथ दुसऱ्या भारतीय असून यापूर्वी रघुराम राजन यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. सध्या गोपीनाथ या हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
    8 डिसेंबर 1971 रोजी म्हैसूर येथे जन्मलेल्या गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. 2001 मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. प्राप्त केली. पीएचडीनंतर गोपीनाथ या शिकागो विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. 2005 पासून हार्वर्ड विद्यापीठात विविध पदांवर त्या काम करत आहेत. दरम्यान, गोपीनाथ यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी काम केले आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय आर्थिक संशोधन केंद्राच्या सहसंचालक, फेडरल रिझर्व्ह बॅंक ऑफ न्यूयॉर्कच्या आर्थिक सल्लागार मंडळाच्या सदस्या, केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार म्हणून मानद मुख्य सचिव दर्जा, फेडरल रिझर्व्ह बॅंक ऑफ बोस्टनच्या अतिथी संशोधक सल्लागार, जी-20 परिषदेसाठी भारताच्या अर्थमंत्रालयाच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या, अमेरिकन इकॉनॉमिक्‍स रिव्ह्यूच्या सहसंपादक, रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी चलन विनिमय दर, व्यापार आणि गुंतवणूक, मौद्रिक धोरण, कर्जे आणि उदयोन्मुख बाजारातील संकटे या विषयावर अनेक शोधनिबंध सादर केले आहेत.
     गोपीनाथ यांची आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करताना ख्रिस्तिना लगार्ड म्हणाल्या की, गोपीनाथ या जगातील उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. उत्तम शैक्षणिक पात्रता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता या पदासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. गोपीनाथ यांच्या तांत्रिक कौशल्याचा फायदा भारताच्या भांडवली बाजाराच्या वाढीसाठी आणि ढोबळ आर्थिक धोरणांच्या विकासासाठी फायदेशीर ठरू शकतो, असे जाणकारांनी म्हटले आहे.

2. पिनेलोपी गोल्डबर्ग 

    26 एप्रिल 2018 ला जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून येल विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका पिनेलोपी गोल्डबर्ग यांची नियुक्ती केली. 1963 मध्ये जन्मलेल्या गोल्डबर्ग या जर्मनीच्या फ्रेबर्ग विद्यापीठाच्या पदवीधर असून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे. ग्रीक-अमेरिकन वंशाच्या गोल्डबर्ग यांचा ढोबळ अर्थशास्त्राच्या उपयोगितेवर खास अभ्यास असून विकसनशील देशांच्या व्यापारातील विषमता आणि उत्पादकता, नफा आणि नवसंकल्पना तसेच बौद्धिक संपदा अधिकारांचा उपयोग यावर त्यांचा विशेष भर आहे. गोल्डबर्ग यांनी अर्थशास्त्र विषयातील अनेक शोधनिबंध सादर केले असून त्यांना अनेक पुरस्कार व फेलोशिप मिळाल्या आहेत. त्या अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनच्या उपाध्यक्षा असून इकॉनॉमेट्रिक सोसायटीच्या कार्यकारी समितीच्या सदस्या आहेत. गोल्डबर्ग यांनी 2011 ते 2017 दरम्यान अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या मुख्य संपादक म्हणून काम केले आहे. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ आर्ट ऍण्ड सायन्सच्या सदस्या असून त्यांना प्रतिष्ठेची गॅजेहम मेमोरियल फाऊंडेशन आणि स्लोआन रिसर्च फेलोशिप, तसेच बोडोसाकी पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्‍स रिसर्चच्या सहायक संशोधक आणि ब्युरो ऑफ रिसर्च इकॉनॉमिक ऍनालिसीस ऍण्ड डेव्हलपमेंटच्या सदस्या आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. गोल्डबर्ग यांची जागतिक बॅंकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करताना अध्यक्ष जिम योंग किम म्हणाले की, गोल्डबर्ग यांचा प्रगल्भ शैक्षणिक अनुभव, बौद्धिक चातुर्य आणि जिज्ञासूपणा जागतिक बॅंकेला निश्‍चितपणे नव्या उंचीवर नेईल. त्यांचा विकसनशील देशांच्या विकासातील अडचणींवर विशेष अभ्यास असून त्याचा उपयोग या ठिकाणी होईल. गोल्डबर्ग विकसनशील देशांच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेविषयी प्रभावी काम करतील, अशी मला खात्री आहे.

3. लॉरेन्स बुन 

    आर्थिक सहकार्य आणि विकास परिषदेचे (ओईसीडी) महासचिव एंजेल गुरिया यांनी ओईसीडीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लॉरेन्स बुन यांची 5 जूनला नियुक्ती केली. जुलै महिन्यात त्यांनी कॅथरीन मॅन यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली. मूळ फ्रान्सच्या असलेल्या बुन यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली असून लंडन बिझीनेस स्कूलमधून पीएचडी प्राप्त केली आहे. मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून त्या परिषदेच्या आर्थिक विभागप्रमुख असतील. आंतरराष्ट्रीय मौद्रिक आणि आर्थिक समिती, जी-7 आणि जी-20 परिषदेत त्या ओईसीडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. बुन यापूर्वी एएक्‍सए समूहाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आणि एएक्‍सए आयएम ग्लोबलच्या मल्टी असेट क्‍लायंट सोल्युशन आणि रिसर्च हेड म्हणून काम करत होत्या. त्यांनी फ्रान्सच्या सीईपीआयआय या आर्थिक संशोधन संस्थेत संशोधक म्हणून, तर 1998-2004 दरम्यान ओईसीडीच्या अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले होते. त्या फ्रान्सच्या बार्कले कॅपिटलच्या मुख्य अर्थतज्ज्ञ, तसेच बॅंक ऑफ अमेरिकेतील युरोपियन आर्थिक संशोधन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकसुद्धा होत्या. 2014 ते 2016 दरम्यान, बुन या फ्रान्सच्या अध्यक्षांच्या बहुपक्षीय आणि युरोपियन आर्थिक व वित्तीय घडामोडी आणि जी-20 परिषदेसाठी विशेष मार्गदर्शक होत्या.

No comments:

Post a Comment

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...