कथा पहिल्या शेतकरी आत्महत्येची...

      २० मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण हे नेहमीप्रमाणेच सकाळी जागे झाले. तेव्हा आजच्यासारखे इंटरनेट अथवा मोबाईल नसल्याने वृत्तपत्राच्या माध्यमातूनच बातम्या कळायच्या. त्यामुळे सकाळी गावात आलेल्या वृत्तपत्रातील बातमीने चिलगव्हाण गाव हादरलंच.. बातमी होती गावातीलच साहेबराव करपे पाटील यांनी वर्धाजवळील दत्तपूर आश्रम येथे जाऊन कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केल्याची.. शासनाच्या दरबारी नोंद झालेली ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ठरली... तेव्हापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या मागे सुरू झालेला आत्महत्यांचा ससेमिरा अद्याप थांबता थांबेना...

     चिलगव्हाण गावातील साहेबराव करपे पाटील हे प्रतिथयश शेतकरी.. तब्बल १२५ एकर शेती, जवळपास अर्धा एकरभर असलेला भव्य वाडा.. हाताखाली कामाला २०-२५ नोकर-चाकर.. गावाचं १५ वर्षे सरपंचपद सांभाळलं असल्याने पंचक्रोशीत नाव होतं.. पत्नी मालतीसह त्यांना विश्रांती, मंगला व सारिका या तीन मुली व भगवान हा मुलगा होता.. शेतीसह संगीतात आवड असलेले साहेबराव नेहमीच गावातील लहान मुलांना संगीत शिकविण्यास उत्सुक असायचे. स्वतः संगीत विशारद असलेल्या साहेबराव यांनी घडविलेले गावातील अनेकजण आज संगीत शिक्षक म्हणून काम करताय. आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करून त्याचा इतर शेतकऱ्यांना सुध्दा फायदा व्हावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. सव्वाशे एकर शेती म्हटल्यावर खर्च सुध्दा तेवढाच असायचा. एवढी मोठी शेती जरी असली तरी नेहमी भरपूर उत्पन्न होईलच असे काही नाही. तसेच अधून मधून येणारी नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर यातून शेतकऱ्याची मानसिकता खचायला लागते. डोक्यावर बँकेच्या कर्जाच्या वाढत्या डोंगरापेक्षा कर्जाच्या वसुलीसाठी बँकेकडून पाठीमागे लागलेला तगादा साहेबरावांना अधिक त्रासदायक ठरू लागला. त्यातच एम.एस.ई.बी.ने थकीत असलेल्या वीजबिलाची रक्कम न भरल्याने शेतातील कृषी पंपाची व घरची वीज तोडली. घरची वीज तोडल्याने आत्मसन्मान खचलेल्या साहेबराव यांच्या मनावर विपरीत परिणाम केला. नियतीची विचारचक्रे त्यांच्या मनात घिरट्या घालू लागली. त्यातूनच त्यांनी वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी सहकुटुंब ते दत्तपूरला जायला निघाले. सोबत त्यांनी कुणालाही न सांगता कीटकनाशक घेतले. तेव्हा मावशीकडे असलेला भगवान या मुलाला सहलीला जाऊ म्हणून दत्तपूरला घेऊन आले. तेव्हा आपल्या बापाच्या मनात चाललेल्या घालमेलीची व अखेरच्या जीवन प्रवासाची पुसटशीही कल्पना भगवानला नव्हती. एके दिवशी आश्रमात असताना साहेबराव यांनी पत्नी मालतीला भजी करावयास सांगितले. तत्पूर्वी त्यांनी भज्यांच्या पीठात कीटकनाशक मिसळले. सर्वप्रथम आपल्या निरागस लेकरांना ती विषमिश्रित भजी खायला दिली. त्यांचा जीव गेल्यावर पत्नी मालतीला भजी खायला दिली. तिचाही जीव गेल्यावर सर्वांच्या कपाळावर एक एक नाणे सुद्धा ठेवले. स्वतःचे जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहून ठेवली. चिठ्ठीत त्यांनी आपल्या मनातील वेदनांना वाट मोकळी करून दिली. त्यातील ओळी होत्या, " येऊ दे दया आता गुरु माऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली "..  १९ मार्च रोजी करपे कुटुंबीय काळाच्या पडद्याआड गेलं. एवढेच नव्हे तर आपल्या आत्महत्येची दखल व शेतकऱ्यांच्या वेदना शासनाला कळव्यात व हे प्रकरण दडपू नये म्हणून आश्रमातील त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर त्यांनी 'कुणीही दार उघडू नये, पोलीसांना बोलवा' अशी सूचना लावून ठेवली होती.
     राज्यातील पहिलीच सामूहिक आत्महत्या ठरलेल्या ह्या घटनेने चिलगव्हाणसह अवघा महाराष्ट्र हादरला होता. दोन दिवस चिलगव्हाण गावातील चूल पेटली नव्हती. एकाच वेळी एकाच कुटुंबातील सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्याचा कठीण प्रसंग गावकऱ्यांवर आला होता. आज या दुर्दैवी घटनेस ३२ वर्ष पूर्ण होत असताना तसेच आज त्यांच्या वाड्याचा मालक बदललेला असला व त्यांची जमीन शिल्लक नसली तरीही त्यांच्या आठवणीने चिलगव्हाण गाव व शेतकरी वर्ग साहेबराव करपे यांच्या आठवणीने मूकआक्रंदन करत आहे. राज्यातील पहिल्या आत्महत्येच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी अन्नत्याग आंदोलन केलं जातं. राज्यासह विदेशात सुद्धा शेतकरी पुत्रांनी शक्य तेथे अन्नत्याग आंदोलन करून आजवर आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांना व सर्व बळीराजाच्या अपार कष्टाला, मेहनतीला अभिवादन केलं जातं.. मात्र गेल्या ३२ वर्षांपासून सुरू झालेला शेतकरी आत्महत्यांचा प्रवास दुर्दैवाने आजही सुरू आहे...





: ऋषिराज तायडे
  ९४०४१४१२१६
  rushirajtayde@gmail.com

मराठीतील डिजिटल क्रांती

         सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
         तिमिरातूनी तेजाकडे प्रभू अमुच्या ने जीवना  ||धृ|| 


         सर्वप्रथम सर्व मराठीजनांना व मराठीवर प्रेम करणाऱ्या सुह्रदांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! गेल्या काही दिवसांपासून किंबहुना काही वर्षांपासून #अभिजातमराठी म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून चालत असलेले आपले प्रयत्न यंदाच्या वर्षी थोडे अधिक जोमाने चालल्याचे बघून #अभिजातमराठी संदर्भात आशावाद वाढलेला दिसतो. याच पार्श्वभूमीवर तुमच्या आमच्या सारख्यांनी पारंपारिक माध्यमांसोबतच ई- माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर धरलेला मराठीच आग्रह निश्चितच कौतुकास्पद आहे. 
        आजच्या ऑनलाईन क्रांतीच्या युगात माणसं ही अधिक जवळ आली असं आपण म्हणतो. वास्तवात प्रत्यक्ष संवाद दुरावला हा मुद्दा अलाहिदा.. लोकांतील आचार-विचार आदानप्रदान करण्याची क्षमता किंवा माध्यम म्हणून भाषा ही पहिली पायरी ठरते. त्यानंतर ती भाषा एखाद्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवून व लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे महत्वाचं काम सद्या डिजिटल क्रांती करत आहे.. याप्रसंगी जर ती आपली बोलीभाषा किंवा मातृभाषा असेल तर ती अधिक समृद्ध व भक्कमपणे प्रचारित होते. आपल्या मराठी भाषेचे उदाहरण घ्या. जगाच्या पाठीवर इतरत्र जेव्हा दोन मराठी माणसं अनवधानाने भेटतात, तेव्हा त्यांना मराठी माणूस भेटला म्हणून झालेला आनंद अवर्णनीय असतो. त्याचप्रकारे डिजिटल जगात आज व्यक्त होताना मराठी भाषेचं वाढलेलं प्रमाण प्रशंसनीय आहे.
        समाजमाध्यम उर्फ सोशल मीडिया हा आजच्या पिढीच्या आयुष्याचा अविभाज्य अंग. सुरुवातीस त्याद्वारे व्यक्त होताना भाषा हा मुद्दा नव्हताच. मन मानेल तसे सोप्या, हिंग्लिश, मारलिश म्हणजेच तरुणाईच्या भाषेत व्यक्त होत असे. मात्र हळूहळू भारतीय भाषा समाज माध्यमांवर बाळसं धरू लागल्या त्याप्रमाणे लोकं आपल्या भाषेतून व्यक्त होऊ लागलीत. मराठी विषयी बोलायचं तर सुरुवातीच्या टप्प्यात मराठीतील काही वर्ण किंवा जोडाक्षरे लिहिताना अडचणी यायच्या. पुढे जाऊन सी - डॅकच्या प्रयत्नाने मराठीतील अद्ययावत मराठी बाराखडी उपलब्ध झाली. या सर्वांचाच परिपाक म्हणजे समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग,आदी ठिकाणी मराठीजनांची जमलेली मांदियाळी आपली भाषा अधिक समृध्द करताहेत. आज अनेकजण विविध माध्यमांवर त्यांचे अनुभवकथन, लेखन, छंद, कविता, प्रवासवर्णन, ई. नव्हे तर ज्या गोष्टी इंटरनेट वर मराठीमध्ये सहजासहजी उपलब्ध नाही अशा बाबी मराठीत भाषांतरीत करून सोप्या पद्धतीने मांडल्या जातायत. उदाहरण द्यायचे झाले तर संगणक विज्ञान क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, आरोग्य शास्त्रातील नवे संशोधने, कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नव्या बाबी आपल्या पर्यंत सहजपणे पोहोचू लागल्या आहेत. 
        याठिकाणी मला ट्विटरवरील मराठी भाषेच्या प्रवासाविषयी थोडं आवर्जून बोलायला आवडेल. सुरुवातीला केवळ १४० अक्षरांची मर्यादा असताना त्यातही मराठीतून लिहिताना आपल्या सर्वांची खूप दमछाक व्ह्यायची. तरी सुद्धा अक्षर मर्यादेचं भान जपत आपण व्यक्त होत असू. सुदैवाने ही अक्षर मर्यादा २८० झाल्याने तर मराठीजनांना विचारांचे जणू धुमारेच फुटले. मर्यादा वाढताच ट्विटरवरील मराठी भाषेचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसून येते. त्याचाच भाग म्हणजे अनेक मराठीप्रेमी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृध्द कशी होईल या उद्देशाने व्यक्त होतात. दरवर्षी राज्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरतं. सर्वांनाच काही संमेलनात जाऊन व्यक्त होता येत नाही, त्यामुळे आपल्या कला- साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून ट्विटरवर आभासी असे #टि्वटरसंमेलन भरवले जाते. याठिकाणी #टि्वटरसंमेलन या हॅशटॅग अनेकजण व्यक्त होतात. नुकतेच १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान हे आभासी साहित्य संमेलन प्रचंड प्रतिसादात पार पडले. #टि्वटरकट्टा हा सुद्धा एक ट्विटरवरील महत्त्वाचा उपक्रम म्हणता येईल. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत थेट प्रश्नोत्तराचा तास रंगतो. राजकारण, समाजकारण, संगीत, चित्रपट, खेळ, ई अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी याठिकाणी हजेरी लावून मराठी लोकांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे वर्षभरातील काही खास दिवशी किंवा सण-उत्सवाला एखादा हॅशटॅग ट्रेण्ड करून त्यांतर्गत अनेकांच्या विचारांचे आदान प्रदान होत असते.
       शासन किंवा इतर प्राधिकारी संस्थांमार्फत मराठीतील अनेक पुस्तके, ग्रंथ, साहित्यांचे डिजीटायझेशन करण्याचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे. भाषा संचालनालय द्वारा दैनंदिन प्रशासन व्यवहारात सातत्याने उपयोगी पडणाऱ्या कार्य दर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, शासन व्यवहार कोश, न्याय व्यवहार कोश या अॅपच्या माध्यमातून सुमारे ८६ हजार इंग्रजी - मराठी शब्दांचे दालन खुले करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासन व्यवहारातील व शास्त्रशाखेतील संज्ञावलींचा मराठीत प्रमाणित असा कोश उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काम भाषा संचालनालय द्वारा होत आहे. त्याच संदर्भातील ३४ परिभाषा कोश व शासन मार्गदर्शन पुस्तकांची निर्मिती होत आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माध्यमातून मराठी विश्वको शाचे २० खंड प्रकाशित झाले आहे. त्यात अ ते ज्ञ पर्यंतचे सुमारे १८०५७ नोंदीचा समावेश आहे. वाचकांना २० खंड सहजगत्या हाताळता व वाचता यावे म्हणून सर्व २० खंडांचे डिजीटायझेशन करून ते पेन ड्राईव्हच्या स्वरूपात उपलब्ध झाले आहे. मराठीचा डिजीटायझेशनचा प्रवास अद्याप बराच बाकी आहे. किंडल सारख्या ई-फलाटावर हवं तेवढं मराठी साहित्य अद्यापही उपलब्ध झालं नाहीये. सुमारे २००० वर्षांपासूनचे मराठीचे पुरावे आपल्याला मिळत असताना तो समृध्द ठेवा जतन करता यावा म्हणून अधिकाधिक मराठी साहित्य डिजीटायझेशन करून ठेवणे गरजेचे आहे. आजही अनेक घटकांचे साहित्य आपल्या अवतीभवती विखुरलेल्या स्वरुपात आहे. एवढंच नाही तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या साहित्यासह महाराष्ट्राची संस्कृती म्हणावी असे लोकसाहित्याचे सुद्धा डिजीटायझेशन होणे गरजेचे आहे. तेव्हा आपण सर्वजण मिळून मराठीच्या प्रसारासाठी, समृद्धीसाठी प्रयत्न करूयात आणि आजच्या मराठी भाषा दिवस ज्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होतोय त्या कुसुमाग्रजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं... 


"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी..
एवढ्या जगात माय मानतो मराठी.



:- ऋषिराज तायडे, 
९४०४१४१२१६
rushirajtayde@gmail.com

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : डॉ.बाबासाहेब आंबेडकर



सभोवतालच्या दुःखाला आव्हान देत ते येतात आणि व्यक्तिगत जीवनाचा त्याग करून समाजातल्या दुःखभरल्या रात्री आणि अंधारलेली मने लख्ख उजळवून टाकतात, अशा मराठी मातीत ज्या असंख्य समाज सुधारकांनी जन्म घेतला, त्यापैकी २० व्या शतकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरावं लागेल. "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा.." असा संदेश देणारे बाबासाहेब... समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणारे बाबासाहेब... देशाला संविधान देऊन महान कार्य केलेले बाबासाहेब... ऊर्जानिर्मिती व जलसंधारणाबाबत देश स्वयंपूर्ण व्हावा म्हणून ,हिराकूड, दामोदर खोरे सिंचन प्रकल्प राबविणारे बाबासाहेब... यासह अनेक पैलू असणाऱ्या बाबासाहेबांचे समाजाप्रती असलेले शेतीविषयक, आर्थिक, सामाजिक विचार अत्यंत मोलाचे आहे. बाबासाहेबांच्या याच विचारातून एकसंघ भारत निर्माण झाला.


बाबासाहेबांचा समाजाशी घनिष्ट संबंध आला तो वकिलीमुळे. त्यातूनच त्यांना जातीयतेच्या भेदभावाच्या रुक्ष कडा दिसू लागल्या. समाजाच्या उद्धारासाठी व अस्पृश्यतेच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी पुढे अविरत कष्ट घेतले. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशाप्रकारे असमानतेचा निषेध केला. मानवतेच्या हक्कांसाठी, सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले. अशा या महान उद्धारकाने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे पवित्र काम उत्तमप्रकारे पार पाडले.  देशाला संघटित करण्याचे कार्य केले. राष्ट्रीय एकात्मता साधायची असेल तर देशातील गरीब लोकांचा आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे असा विचार बाबासाहेबांचा होता. आर्थिक प्रगतीचा वेग वाढविणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, श्रमिक तथा सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे, भविष्यातील आर्थिक विकासाचा पाया असणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग वाढविणे, रोजगाराभिमुख तंत्रज्ञान वापरून अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या लघु व कुटीर उद्योगांना विशेष सवलती देणे, प्रादेशिक समतोल विकास साधणे, आर्थिक सत्ता व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे, शहरी व ग्रामीण भागातील दरी मिटविणे, आर्थिक असमानता दूर करणे, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या दलित,आदिवासी व महिला वर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता संधी उपलब्ध करून देणे, समाजात एकी निर्माण करणे आदी महत्वपूर्ण कार्य बाबासाहेबांनी केले. स्वावलंबन व अंतिमतः गरिबी दूर करणे असा त्यांचा आर्थिक विचार होता. 

याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्यविषयक व संस्कृतीविषयक योगदान हे मौलिक स्वरूपाचे होते. त्यांच्या साहित्यविषयक कार्याचा प्रारंभ त्यांच्या वृत्तपत्रीय वाडःमय निर्मितीतून होतो. बाबासाहेबांनी 'मूकनायक' या वृत्तपत्राची केलेली सुरुवात ही एक अभिनव स्वरूपाची घटना होती. जाती-धर्माच्या जोखडात पिचलेल्या मूकनायकाला वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचा मिळवून दिली. 'काय करू आता धरूनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ।। नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।' या संत तुकाराम महाराजांच्या ओळी मूकनायकाच्या बिरुदावली म्हणून वापरल्या गेल्या. पुढे ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक नव्याने सुरु केले. त्यानंतर 'जनता' हे नियतकालिक काढले. 'जनता' या नियतकालिकेचे शेवटी 'प्रबुद्ध भारत' या वृत्तपत्रात रूपांतर झाले. 'मूकनायक' ते 'प्रबुद्ध भारत' असा प्रवास होत असताना डॉ. बाबासाहेबांची लेखणी अधिकच समृद्ध होत विविधांगी विषयाचा वेध घेऊ लागले. 

त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महत्त्वाची ग्रंथसंपदा आपल्या लेखणीतून प्रत्यक्षात उतरवली.  त्यांची ही साहित्यसंपदा आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. बाबासाहेबांनी विविधांगी विषयावर चौफेर लिखाण केले आहेत. त्यांच्या ग्रंथसंपदेवर केवळ ओघवती नजर टाकली, तरी आपल्याला त्यांच्या कार्याचा आवाका येईल.
 
* Administration and Finanace of East India Company,   
* The National Dividend of India: A Histrorical and Analytical Study,   
* Castes in India: Their Mechanism,   
* Genesis and Development,  Federation Versus Freedom,  
* The Problem of Rupees: Its Origin & Its Solution,   
* Pakistan or The Partition of India,  
* Annihilation of Castes,
* Ranade, Gandhi and Jinnah,   
* Mr.Gandhi and the Emancipation of the Untouchables,  
* What Congress and Gandhi have done to the Untouchables,  
* Communal Deadlock and a way to solve it,   
* States and Minorities-What are their rights and how to secure them in the   Constitution Free India,  
* Who were Shudras? How they came to be the Fourth Verna in Indo-Aryan Society,  *The Riddles in Hinduism,   
* Maharashtra as a Linguistic Province,  
* Thoughts on Linguistics States,    
* The Rise and Fall of Hindu Women,  
* The Pali Grammar, Dictionary and Bouddha Pujapath,  
* Buddha and his Dhamma,  
* Small Holdings in India and their Remedies, 
         
आपल्यापैकी अनेकांना माहिती नसलेले बाबासाहेबांचे कार्य म्हणजे सिंचन व ऊर्जाविषय कार्य. देशाच्या कृषी व उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक बाब म्हणजे पाणी आणि वीज होय. त्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असे शहाणपण बाबासाहेबांनी देशाला दिले. स्वातंत्र्यापूर्वी व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांकडे सार्वजनिक बांधकाम, सिंचन, ऊर्जा व श्रम मंत्रालय ही खाती होती. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर जलसंपत्ती विकासासाठी देशाच्या विविध नद्यांच्या खोऱ्यांच्या विकास, सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी नदी खोरे विकास प्राधिकरण, सिंचन व ऊर्जा प्रकल्पाच्या यशस्वी अंबालबजावणीसाठी कुशल तंत्रज्ञ गटाची स्थापना केली. याचाच परिपाक म्हणजे आजचे केंद्रीय जल आयोग. डॉ.आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून व अभ्यासपूर्ण नियोजनातून हिराकूड व सोन नदी प्रकल्प, दामोदर खोरे योजना, महानदी व कोसी नदी योजना यशस्वीपणे राबविल्या. तसेच सध्या जे केंद्रीय ऊर्जा प्राधिकरण आहे, त्याची मूलतः सुरुवात १९४४ साली स्थापन झालेल्या केंद्रीय ऊर्जा मंडळातून झाली, जे की बाबासाहेबांच्या प्रयत्नातून घडले. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देशातील सिंचन व ऊर्जा धोरणाचे पितामह म्हणतात. 
      
म्हणूनच बाबासाहेबांबद्दल म्हणावंसं वाटतं, २० व्या शतकातील अतुलनीय असामान्य बुद्धिजीवी व्यक्तिमत्व ज्यांनी "सर्वेपि सुखिन: संतु | सर्वे संतु निरामय:" या अर्थाचं ज्ञानदेवांचं पसायदान वास्तवात आणण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं....

बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले




"माये गं माये,

नगं सोडू माझी शाळा,

शिकून शिकून लई मोठं

व्हायचंय मला..!! "

        असा ठाम निश्चय करणारी आजची ग्रामीण भागातील मुलगी  आणि हाच आत्मविश्वास तिच्यात निर्माण करण्यास लावणारी, जिच्या दूरदृष्टीने अवघ्या भारताला स्त्री- शिक्षणाचं महत्व पटवून देणारी, जिच्यामुळे विश्वाच्या पटलावर यशस्वी प्रगल्भ भारताचं नाव कोरणाऱ्या समस्त यशस्वी कर्तृत्ववान व्यक्तींना जन्म देणाऱ्या समस्त मातांना सुसंस्कारित दिशा देणारी, उच्च-निच्चतेचे बंधन झुगारून अवघ्या मानवी समाजाला योग्य दिशा दाखवणारी, तेजाचा वारसा देणारी एकमेव स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले.. 

"नतमस्तक तिच्या चरणी, जिच्यामुळे घडलो आम्ही,

अन घडलं तुम्ही, वारसा हा स्त्री शिक्षणाचा

न मोडेल कोणी न मोडेल कोणी.. !! "

     ३ जानेवारी १८३१ रोजी साताऱ्यातल्या नायगावला लक्ष्मीबाई नेवासे पाटलांच्या घरी जन्म घेणारी ही स्त्री, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंच्या परीस स्पर्शाने तेजोमय राष्ट्र घडविणारी ठरली. सावित्रीबाईंची खरी प्रतिमा म्हणजे पतीच्या क्रांतिकार्यात सहभागी झालेली 'शालीन' स्त्री, ज्योतीबांच्या क्रांतिकार्यात सतत कार्य करणाऱ्या सावित्रीबाईंचे कार्य तितकेच महत्वाचे होते.

    मुलींना शिकविते म्हणून शेणा-मातीच्या गोळ्याचा मार सहन करणे, घराचा पाण्याचा हौद सर्वसामान्यांसाठी खुला करणे, बालहत्या प्रतिबंधक गृहातील विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन वात्सल्यपूर्ण संगोपन करणे, असे क्रांतिकारी कार्य या देवतेने केले. तसेच विवाहानंतर स्वतः साक्षर होऊन विपरीत परिस्थितीत शिक्षिका बनणे, मुख्याध्यापिकेचे काम विना वेतन आनंदाने करणे, दुष्काळात व्हिक्टोरिया आश्रमातील भुकेल्या एक हजार मुलांची भूक भागविणे, ज्योतीबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळणे, प्लेगच्या साथीत मृत्यूला कवटाळावे लागते हे माहिती असून सुद्धा मानवतेच्या कार्यात अखंड वाहून घेणे असे डोळे दिपविणारे सावित्रीबाईंचे कार्य समाजापुढे आदर्श ठेवून आहे.

        चूल आणि मूल एवढाच सीमित संसार करण्यापेक्षा अवघ्या समाजाचा संसार त्यांनी आनंदाने व उत्साहाने पार पडला. एकाची माता होऊन जगण्यापेक्षा त्या जगत् माता बनल्या. कठीण असे समाजकार्य करता करता त्यांच्यातील कवयित्री उभारून येत होती. सावित्रीबाईंचा १८५४ साली प्रकाशित झालेला 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह हा अप्रतिमच..  १८९२ साली 'बावनकशी रत्नाकर' हे त्यांचे दीर्घकाव्य प्रकशित झाले. तसेच 'पितरपुराण' नावाचा काव्यसंग्रह त्यांनी रचल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. त्यांची काव्यरचना समाज प्रबोधनपर तर आहेच तसेच त्यांनी विविध विषयांवर सुद्धा काव्य लिहिले आहे. उदाहरणार्थ निसर्गविषयक, सामाजिक, प्रार्थना, आत्मपर, बोधप्रत, इतिहास, स्फुटलेखन अशा अनेक विषयांच्या अनुषंगाने त्यांचे काव्य बहरत गेले.

"ताराबाई माझी मर्दानी

भासे चंडिका रणांगणी,

रणदेवा ती श्रध्दास्थानी

नमन माझिये तिचिया चरणी."

       तसेच कवीचे भावविश्व चेतविणारा चाफा सावित्रीबाईने खालील शब्दात सुरेख चितारला आहे.

"पिवळा चाफा,

रंग हळदीचा

फुलाला आहे...

नाव तयाचे

सुवर्ण चंपक

सृष्टी दागिना

मानस पटतो....!!"

      स्त्रियांच्या बाबतीत असणारा सावित्रीबाईंचा दुरदृष्टीकोन आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरला आहे. संपूर्ण जगाला स्त्री शिक्षणाचे महत्व पटले आहे. आज आदर्श राष्ट्र घडविण्यास स्त्रियांचा त्यांच्या कार्यक्षेत्रातील वाटा नेत्रदीपक आणि ठसठशीत दिसणारा आहे. भविष्याला ओटीत फुलविणाऱ्या अन स्त्रीशिक्षणाचा ठसा उमटविणाऱ्या सावित्रीबाईंची क्रांतीज्योत प्रखरतेने तेजोमय झाली आहे. आज अवघ्या विश्वाला भारतीय स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने  कवेत घेतले आहे. आकाशापासून तर पाताळापर्यंत सर्वच क्षेत्रांत असंख्य स्त्रिया आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे.

   १९ व्या शतकात सावित्रीबाईंनी पाहिलेले स्त्रीजगताचे स्वप्न आज खऱ्याखुऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. म्हणून आज सावित्रीबाई फुले यांना म्हणावेसे वाटते की, "सावित्रीबाई, आज भारतीय स्त्रियांचे सर्व क्षेत्रातील नेत्रदीपक यश पाहण्यासाठी व त्यांचा कौतुक सोहळा साजरा करण्यासाठी आज तुम्ही हव्या होतात..  आज त्यांच्या कार्यकर्तृत्वाला त्रिवार अभिवादन..!!!

              

कमला मिल आगीच्या निमित्ताने...

          गुरुवारी रात्री १२:३० च्या सुमारास मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल परिसरात असलेल्या 'वन अबाव्ह' व 'मोजोस बिस्ट्रो' या दोन हॉटेल्सला लागलेल्या आगीत १४ निष्पाप जीवांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अनेक जखमी झालेत. आगीनंतर नेहमीप्रमाणे चौकशी, तपासणी, निलंबन, कारवाई व त्यावरील चर्चा हे नेहमीचेच सोपस्कार होत आहे.
          पूर्वी मुंबईत असलेल्या अनेक कापड गिरण्या बंद पडल्या. त्या कां व कशा बंद पडल्या हे इथे सांगण्याची गरज नाही. बंद पडलेल्या अनेक गिरण्यांच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकांनी महापालिका तसेच राज्य प्रशासनाला हाताशी धरून टोलेजंग इमारती उभ्या गेल्या. आज या इमारती बघून इथे पूर्वी गिरण्या होत्या हे म्हणणं सुद्धा खोटं ठरू शकतं. या परिसरात फेरफटका मारल्यास लक्षात येईल की जागेत इमारती बांधण्यापासून ते इमारतीमधील चालणाऱ्या धंद्यापर्यंत सर्व काही "आलबेल" असल्याचे जाणवते. दोन इमारतीमधील अंतर हे एवढे कमी आहे कि एका इमारतीतील दुर्घटनेचा फटका शेजारच्या इमारतीला नक्कीच बसतो. नेमके हेच या दुर्घटनेत घडले. शहरातील कमी जागेत टोलेजंग इमारती उभारताना त्यात किती लोकांची ये - जा असते, त्यांच्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेच्या उपाय योजना कशा असतील, आगीसारखे प्रसंग उद्भवल्यास अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी पोचता यावे याकरिता मोकळी जागा किती सोडावी, याचे काहीतरी किमान नियम तर निश्चितच असतील. मात्र हे नियम कुठे व कुणासाठी आहेत हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरू शकतो. मुंबईतील अनेक आगीच्या घटनांचा आढावा घेतला तर असे लक्षात येईल की मुंबईतील इमारती, घरे हे अत्यंत दाटीवाटीने बांधल्या गेल्या आहेत. त्याामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळापर्यंत पोचण्यास विलंब होतो. दरम्यानच्या काळात जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते.
   
'मोजोस बिस्ट्रो' आगीनंतर 

'मोजोस बिस्ट्रो' आगीपूर्वी


         कमला मिल येथील आगीच्या घटनेची व तेथे झालेल्या लोकांच्या मृत्यूच्या कारणांची मीमांसा केली तर दोन्ही हॉटेल्सच्या रुफटॉपवर प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी असलेले मार्ग हे खूपच अरुंद होते. हॉटेल्स मध्ये चालणाऱ्या हुक्क्यासाठी लागणारे विस्तव व बार टेंडर्स कडून होणारे आगीचे खेळ यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातही करामत म्हणजे तेथे परवानगी नसताना केलेले बांबू व प्लास्टिकचे केलेले आच्छादन हे आग भडकण्यास कारणीभूत ठरली. आग लागल्यावर सुरक्षितरित्या बाहेर पडता यावे यासाठी संकटकालीन मार्ग माहित नसल्याने व त्यातच  वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांची धावपळ उडाली. त्याठिकाणच्या रुफटॉपवर सर्वत्र बांबू व प्लास्टिक असल्याने सुरक्षित ठिकाण एकच होते ते म्हणजे स्वच्छतागृह. अनेक जण जीव वाचविण्यासाठी तेथे गेले, मात्र कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूने गुदमरून अनेकांचा जीव गेला.
आगीनंतर वन अबाव्ह हॉटेलवर महापालिकेची कारवाई

            कमला मिलच्या आगीपूर्वी अनेकांनी संबंधित ठिकाणी चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत महापालिकेला कळवले होते, असे म्हटले आहे. महापालिकेने तर याठिकाणी काहीच अयोग्य किंवा चुकीचे घडत नसल्याचा दावा करत त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. तर दुसरीकडे एका सहाय्यक आयुक्तांनी सांगितल्यानुसार, एखाद्या ठिकाणी कारवाईची नोटीस पाठवली असता राजकीय दबाव किंवा न्यायालयातून कारवाईवर स्थगिती आणली जाते. म्हणजे मुंबईत घडलेल्या घटनेला केवळ हॉटेलचालक व महापालिकाच नाही तर राजकीय नेते सुद्धा जबाबदार असल्याचे दिसून येते.
      तेव्हा मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्स, हुक्का पार्लर येथे केलेले अनधिकृत बांधकामे तोडण्यास आता पालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई किती काळ चालणार हा सद्यातरी प्रश्न असला तरी तो शेवटी फार्सच ठरतो. कारण यापूर्वी झालेल्या अनेक दुर्घटनांचा विशेषतः एल्फिन्स्टनचे उदाहरण आपल्याला माहितीच आहे. असो, यावेळी तरी ती बांधकामे अनधिकृत रित्या पुन्हा उभी राहू नये म्हणजे मिळवलं.

निढळ वासियांच्या निढळाच्या घामाची समृद्धी



           गाव करी ते राव काय करी अशी आपल्याकडे म्हण आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण निढळ या गावात बघायला मिळते. निढळ हे साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील एक छोटेसे गाव. या गावाला भेट देण्याची संधी नुकतीच मिळाली होती. माण-खटाव हा राज्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जात असल्याने निढळ हे गाव सुद्धा तसेच असेल अशी खुळी शंका आमच्या मनात होती. मात्र गावाच्या वेशीवर प्रवेश करताच आमची शंका दूर झाली. गावाच्या तीनही बाजूला असलेल्या डोंगररांगा, त्यावरील केलेले पाणलोट विकासाचे उत्कृष्ठ काम, ओढ्यांवर असणारे साखळी बंधारे, त्यावरून खळाळून वाहणारे पाणी, रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे, आदींमुळे गावाची श्रीमंती नजरेत भरत होती.
          
           ग्रामविकासाच्या नानाविध योजना यशस्वीपणे राबवित असलेल्या निढळने प्रगतीची कास धरली आहे. या योजना केवळ राबविल्याच नाही तर त्यामध्ये भरीव काम करत अनेक पुरस्कार पटकावले. निढळच्या विकासाची यशोगाथा सरपंच श्रीरंग निर्मळ, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष दशरथ दळवी यांनी आम्हाला समजून सांगितली. सोबतच आमच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.  
        पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे मुळगाव असलेले निढळ हे खटाव तालुक्यातील ५००० लोकसंख्येचे गाव. दुष्काळग्रस्त भाग असल्याने गावाने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे. चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. गावाला, समाजाला आपले काही देणे लागते, या उदात्त हेतूने त्यांनी ग्रामविकासाची संकल्पना गावकऱ्यांपुढे ठेवली. त्यातून गावकऱ्यांनी ग्रामस्वच्छता, रस्ते, महादेवाचे मंदिर आदी कामे केली. १९९५ साली दळवी साहेबांच्या प्रयत्नातून नाबार्डकडून दीड कोटींचा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम निधी मंजूर झाला. मात्र, लोकसहभागाचा अभाव, पाणलोटाचे महत्व न कळल्याने ही योजना परत गेली. निढळवासियांना त्यांच्या हातून घडलेल्या चुकीचा फटका १९९९-२००० च्या दुष्काळात बसला. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की गावात टँकर्स, चारा छावण्या सुरु कराव्या लागल्या होत्या. या घटनेने मात्र गावकऱ्यांचे डोळे उघडले. झालेली चूक पुन्हा करायची नाही व परत गेलेली योजना परत आणायची असा ठराव २ ऑक्टोबर २००१ रोजी घेतली. २००४ साली पाणलोट विकास कार्यक्रम प्रत्यक्षात सुरु झाला.
            तत्पूर्वी निढळने २००१ पासून ग्रामविकासाची कास नव्याने धरली होती. २००२ साली राज्य शासनाने राबविलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये प्रथम पुरस्कार निढळने पटकावला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमिसंधारण पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील निर्मल ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार निढळला मिळाले.   या पुरस्काराने गावकऱ्यांना लोकसहभागातुन आपण काय करू शकतो हे कळाले. 
           ग्राम विकास समितीचे अध्यक्ष दशरथ दळवी गावाच्या विकासाबाबत बोलताना म्हणाले की २००४ पासून सुरु झालेला एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम सुरुवातीला कराडच्या एका खासगी संस्थेला कंत्राटी पद्धतीने दिल्या गेला. मात्र, कामातील दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे ही योजना स्वतः राबविण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. पहिल्या टप्प्यात १५० हेक्टर क्षेत्रावर काम करण्यात आले. सलग समतल चर (सीसीटी), खोल सलग समतल चर (डीप सीसीटी), सिमेंट बंधारे, दगडी बांध, वृक्षारोपण, आदी कामे करण्यात आली. निढळच्या तीनही दिशेला डोंगर असल्याने त्यावर पडणारे पावसाचे पाणी वेगाने वाहून जात होते. म्हणून डोंगर उतारावर सीसीटी ऐवजी डीप सीसीटी खोदण्यात आले. कारण सीसीटींची खोली कमी असल्याने गाळाने ते लवकर भरतात व आवश्यक तितके जलसंधारण होत नाही. म्हणून ० ते ८ टक्के उताराच्या जमिनीवर १ मी रुंद व १ मी खोल आकाराचे डीप सीसीटी खोदण्यात आले. उतारानुसार खोलीचे प्रमाण कमी-जास्त करण्यात येते. माथा ते पायथा काम करत असताना पावसाचे पडणारे पाणी हे दहा फुटांपेक्षा जास्त वाहू नये, म्हणून उपाययोजना करण्यात येते. त्यामुळे डोंगर उतारावरून वाहत येणारे पाणी चरांमध्ये साठून चांगल्या पद्धतीने जल व मृदा संधारण झाले. शेतातील पाणी शेतातच मुरावे म्हणून शेतीबांध तयार करण्यात आले. तसेच डोंगर उतारावर लावलेली झाडे झपाट्याने वाढली, ओसाड डोंगरं हिरवीगार झाली, असे दशरथ दळवी म्हणाले.
          सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालेल्या पाणलोट विकासाच्या कामामुळे गावकऱ्यांचा हुरूप अधिक वाढला. १५० हेक्टर्स पासून सुरु झालेले काम बघता बघता २००० हेक्टर्स पर्यंत वाढवले गेले. गावातून वाहणाऱ्या ४ ओढ्यांचे खोलीकरण करून त्यावर ५० साखळी बंधारे बांधण्यात आले. त्यातून निढळचा परिसर जलसमृद्ध झाला. विहिरी, बोअर, हातपंप यांना भरपूर पाणी आले. डोंगरउतार, माळरान, रस्ते-ओढे यांच्या दुतर्फा केलेले वृक्षारोपण यामुळे परिसर हिरवागार झाला आहे. निढळने आजपर्यंत केलेले काम हे एवढे प्रचंड आहे की त्यांनी त्यांची आगामी अनेक वर्षाची तहान मिटवली आहे. मात्र गावकऱ्यांची काम करण्याची तहान मात्र अजिबात मिटलेली दिसत नाही. आजही गाव परिसरात ४ जेसीबी मशिन्सच्या साहाय्याने जलसंधारणाचे काम केले जात आहे. डोंगरावरचे पाणी डोंगरावरच थांबावे म्हणून तेथे ठिकठिकाणी छोटे-छोटे जलसाठे तयार केले जात आहे. त्यात पाणी साठून डोंगरउतारावर लावलेल्या झाडांना पाणी पुरवठा होऊन त्याची जोमाने वाढ होत आहे.      
           ज्या पद्धतीने गावात जलसमृद्धी आली, त्यापाठोपाठ आर्थिक समृद्धी सुद्धा येऊ लागली. वर्षातून एकच पीक घेणारा शेतकरी आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे वर्षातून २ ते ३ पिके घेऊ लागला. त्यामुळे गावकऱ्यांच्या खिशात पैसे खेळू लागले. शेतकऱ्यांची पैश्यांची गुंतवणूक व्हावी म्हणून गावात निळकंठेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची २००० साली स्थापना करण्यात आली. जवळपास १००० सभासद संख्या असलेल्या या पतसंस्थेत ५ कोटींच्या वर ठेवी आहेत. नुकतीच पतसंस्थेची दुसरी शाखा नवी मुंबईतील कामोठे येथे सुरु झाली आहे. आगामी काळात पुणे व सातारा येथे शाखा सुरु होत आहे.
 
         गावात ५५ लाख रुपये खर्चातून ग्रामपंचायतीच्या  नूतन इमारतीचे बांधकाम वेगात सुरु आहे. लवकरच ग्रामपंचायतीचे कामकाज नव्या इमारतीतून सुरु होऊन जुन्या इमारतीत महिला बचत भवन सुरु करण्यात येणार आहे. महिला भचत भवनच्या माध्यमातून गावातील महिलांना व बचत गटांना प्रगतीचा मार्ग मिळणार आहे.
          अशाप्रकारे निढळने चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनात व लोकसहभागातून गावाचा विकास साधला.. नियोजनबद्ध पद्धतीने जलसंधारण, मृदसंधारण यासह अन्य क्षेत्रात साधलेली प्रगती राज्यातील इतर गावांसाठी नक्कीच आदर्श आहे. इतर गावांनी सुद्धा निढळ सारखे "निढळाच्या घामाची" समृद्धी आपल्या गावात आणावी व आपल्या गावाला, राज्याला पाणीदार बनविण्यास हातभार लावावा..


-ऋषिराज तायडे,
पुणे.
९४०४१४१२१६
rushirajtayde@gmail.com



स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न...

   
          गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील अनेक शहरामधील कच-याचा प्रश्न कठीण होत चालला आहे. ज्या शहरालगतच्या गावात कचरा टाकला जातो त्या गावामधील ग्रामस्थ आपल्या गावात कचरा टाकण्यास विरोध करत असल्याने व ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात अनेक बैठका होवूनही कचरा प्रश्नावर तोडगा काही निघत नाहीये. एकंदरीत विचार केला तर ग्रामस्थांची भूमिकाही न्याय्य आहे. शहरातील कचरा त्यांच्या परिसरात टाकून त्यांच्या निरोगी जीवन जगण्याच्या अधिकारावर आपण अवडंबर आणतोय. त्यांना सुद्धा गरिमापूर्ण जीवन जगण्याचा घटनादत्त अधिकार आहे. मग या कचा-याच्या भीषण प्रश्नावर तोडगा काढायचा कसा..? एकच उपाय आहे... “ वेंगुर्ला पॅटर्न”..!!!
     मध्यंतरी पुण्यात वसंत व्याख्यानमालेत वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री.रामदास कोकरे यांचे घनकचरा व्यवस्थापन याविषयी व्याख्यान झाले. श्री. कोकरे यांनी प्रशासन व लोकसहभागातून संपूर्ण वेंगुर्ला शहर व परिसर कचरामुक्त केलेच नाही तर गावातून डम्पिंगग्राउंड सुद्धा हद्दपार केले. शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी हा पॅटर्न राबवला पाहिजे. वेंगुर्ल्यात नेमकं काय केलं हे जाणून घेऊया..  नगरपालिकेने सर्वप्रथम शहरात प्लास्टिकबंदी केली, प्रसंगी कठोर भूमिका घेतली. प्लास्टिकबंदी केल्याने शहरातील निम्मा कचरा कमी झाला. जनतेने आपल्या घरात निर्माण होणा-या कच-याचे 4 भागात वर्गीकरण केले.- ओला, सूका, कागद, प्लास्टिक/काच बाटली, ई. शहरातील ओल्या कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया शक्य आहे, त्यातून बायोगँस,बायोसीएनजी, वीज, खत तयार करण्यात येते. राज्यात पुण्यासह अनेक ठिकाणी ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आहेत, पण ते पुरेशे व पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास ओल्या कचऱ्याचा प्रश्न सुटू शकतो. त्याचप्रमाणे कागदाचा १०० टक्के पुनर्वापर होवू शकतो.
       वेफर्सची पाकिटे, दूध पिशवी, चॉकलेटचे रेपर्स, थर्माकोल, ई कच-याचा सुद्धा पुनर्वापर होवू शकतो. वेंगुर्ल्यात या प्रकारचा कचरा बारीक करून तो २० टक्के प्रमाणात उकळत्या डांबरात मिसळून रस्तेनिर्मिती केली जाते. प्लास्टिक, काचेच्या बाटल्या भंगारात विकून त्यातून पैसा मिळवला जातो. त्यामुळे प्लास्टिक व थर्माकोल कच-याची समस्या १०० टक्के सुटली. झाडाच्या तुटलेल्या फांदया, शेतातील काडीकचरा यापासून कांडीकोळसा तयार करण्यात येतो, ज्याचा वापर ग्रामीण भागात इंधन म्हणून करण्यात येतो. त्यामुळे सरपणासाठी परिसरातील झाडा-झुडपांची कत्तल घटल्याचे त्यांनी सांगितले. वेंगुर्ल्यात या पद्धतीने कचरा व्यवस्थापन करून प्रतिमाह सुमारे दीड लाख रुपये कमविल्या जाते. तेथील पूर्वीच्या डम्पिंगच्या जागेवर आज छानशी बाग फुलवली आहे.

जनतेचा सहभाग महत्वाचा
      कचरा प्रश्नाबाबत फक्त प्रशासनाला जबाबदार ठरविण्यापेक्षा जनतेने सुद्धा कमीतकमी कचरा निर्माण होईल याचा विचार करावा. आपल्या घरातील कच-याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून ओला कचरा, निर्माल्य घरातच जिरवून त्यातून सेंद्रिय खत तयार करावे. किराणा माल घरी आणल्यावर त्यातून उरणारा कागद, पाकिटे फेकुन न देता पुन्हा वापरता येईल. या सर्व बाबी प्रभावीपणे अंमलात आणल्या तर शहराचा कच-याचा प्रश्न निश्चितपणे सुटू शकतो.



स्वच्छतेचा हा वेंगुर्ला पॅटर्न जाणून घेण्यासाठी खालील ध्वनिचित्रफीत आपण बघू शकतो. 

वेंगुर्ला पॅटर्नhttps://www.youtube.com/watch?v=iIZuSXaGcwk

ऋषिराज तायडे
9404141216 

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...